पान:गांव-गाडा.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९०      गांव-गाडा.

मोठ्या मिनतवारीने चौपट पांचपट मजुरीवर बोजे नेण्याला कबूल होतात. उतारू म्हणतील की आम्हांपैकी एक जण धर्मशाळा पाहून येतो, तर रेलवे पोलीस कान्स्टेबल तिकीट मास्तर वगैरेंचा तगादा लागतो की आधी स्टेशनाबाहेर पडा. कमजास्त करून स्टेशन हमालाकडून टेशनाबाहेर बोजे न्यावे आणि ते तेथून बिऱ्हाडापर्यंत नेण्यासाठी दुसरा हमाल पहावा ह्या उद्देशाने येण्याजाण्याची वाट सोडून रस्त्याच्या कडेला गांठोडी लावून इकडे तिकडे पहावें, तो स्टेशन हमालाचे सांगीवरून स्टेशनाबाहेरचे पोलीस मागे लागलेच समजा की चाल बोजा उठाव. अशा कोंडमाऱ्यांत स्टेशन हमाल मागेल ते कबूल करावे लागते. रेलवेचे पोलीस व हलके नोकर ही खळखळ पाहातात, पण उतारूला त्यांची मदत क्वचित् पोहोंचते. हमाल, गाडीवान, दुकानदार, नावाडी, वगैर सर्वांचा एकच भिक्षुकी मंत्र, मोठे यात्रा करण्याला निघालां! काही धर्म करा, पुण्य करा, कोणाला दुःख देऊ नका. स्टेशनांतून बाहेर पडले ह्मणजे हे हमाल असेल तेथील म्युनिसिपालिटीच्या जकातीच्या नाकेदाराला खुणवितात, आणि तोही चिरीमिरी मागतो. तसेंच गाडी येण्याच्या अगोदर तिकीट काढण्याचे आमिष दाखवून ते कोचिंग क्लार्कच्या नांवावर तिकिटामागे आणा दोन आण्याचा चट्टा देऊन तिकिटें काढून देववितात, आणि चांगली जागा धरून बसण्यासाठी अगाऊ गेले पाहिजे असें सांगून रेलवे पोलीस व तिकीट कलेक्टर ह्यांच्या नांवानें आठचार आणे पानसुपारी घेऊन गाडीत बसवितात. थोड्या वेळाने पहावें तर प्रवाशांची एकच गर्दी गाडीत घुसते, आणि सर्व पैसे फुकट गेले असें आशाळू प्रवाशाला कळून येते. फक्त गाडींत जागा देतो एवढ्या मेहरबानीखातर कित्येक हमाल काडीचे ओझें न उचलतां उतारूंना गच्च भरलेल्या डब्यांत आणून गुदरतात आणि त्यांकडून दोन चार आणे उपटतात.

-----

 १ जबलपुर स्टेशनवर सर्व अधिकारी लोकांचे यात्रेकरी लोकांकडे फार दुर्लक्ष आहे. याकरितां सदरचे स्टेशन चुकवून दुसरे स्टेशनचे तिकिट घ्यावें.  साळूजीजी-कृत काशीयात्रा पृष्ठ ९.