पान:गांव-गाडा.pdf/311

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८८      गांव-गाडा.

बंदी केली आहे की, त्यांचे दर्शन घेतां घेतां आणि त्यांपुढे पैसा अधला ठेवतां ठेवतां पुरे वाट होते ! ह्या चक्रव्यूहांतून बाहेर पडावें तेव्हा का मुख्य देवाचे दर्शन होते. तपासाअंती असे समजले की, अनेक स्वार्थी पुजाऱ्यांनी मोठमोठ्या देवळांमध्ये जागा विकत घेतली व तेथें देवदेवतांची स्थापना करून आपल्या पोटपाण्याची निचिंती केली. ह्याप्रमाणे मुख्य देवांच्या वतनदार पुजाऱ्यांना हे पुजारी जडले व त्यांमध्येही पुष्कळ पेंढार भिक्षुकांची भर पडली, आणि सर्व ठिकाणच्या क्षेत्राक्षेत्रांनी जिकडे तिकडे देवळेंच देवळे, मूर्तीच मूर्ती, आणि याचकच याचक झाले आहेत. याचक वृत्तीने एकटा ब्राह्मण वर्णच डागला आहे असें नाही, तर ती हिंदू समाजाच्या अगदी शेवटच्या थरापर्यंत जाऊन खेंटली आहे हे मागे सांगितलेच आहे. अनेक जातींचे हजारों लोक तीर्थांवर, देवळांत आणि दोहोंच्याही वाटांनी असलेल्या स्टेशनांवर व धर्मशाळांत दान मांगतात. त्यांमध्ये जे कोणी देवाच्या मूर्ती व व चित्रे दाखवून पैसे मागतात, त्यांना अट्टल म्हटले पाहिजे. त्रिवेणीच्या खेपा करणाऱ्या नावाड्यांना सरसकट कमीत कमी दोन रुपये प्राप्ति होते. एका कोळ्याने ह्याच्यापेक्षा ज्यास्त किफायत मिळावण्याची युक्ति काढली, ती अशीः त्याने आपले नावेमध्ये गंगायमुनेच्या मूर्ति बसविल्या आहेत, व त्यांच्या पुढे तो कोणा तरी राख फांसलेल्या साधूला रोजंदारीने घंटा वाजविण्याला व आशीर्वाद देण्याला बसवितो. यात्रेकरूंची नाव दिसली की तिचे पुढें तो आपली नाव आणितो व पैसे उकळतो. क्षेत्रांच्या न्हाव्यांचा अनुभव घेतला म्हणजे जातधंद्याच्या पद्धतींतले दोष चांगले दिसून येतील. त्रिस्थळीच्या न्हाव्यांना इन्कमटॅक्स आहे असे सांगतात. परंत बहुतेकांचा हात व हत्यार वाईट असते. ते क्षौराचे पैसे शहरच्या चांगल्या न्हाव्यापेक्षाही ज्यास्त घेतात आणि तेही हक्कानें रुसून व भांडून. ह्याखेरीज धर्म म्हणून आणखी पैसे मागत सुटतात.

-----

 १ अलीकडे पंढरपूरच्या आगगाडीमध्ये काही आंधळे अभंग गाऊन थाटाने पैसे मिळवितात.