पान:गांव-गाडा.pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायात्रा.      २८७

मुळीच साफ न ठेविल्यामुळे त्यांतल्या अति घाणेरड्या पाण्याचें तीर्थप्राशन, देवळाच्या भोवताली गराडा घातलेल्या भिकाऱ्यांचा अमंगळपणा, देवळांतील गर्दी व रोगी-महारोगी ह्यांनी तेथें तुडविलेल्या पाण्यांतून व चिखलांतून जाणे येणे, पंचामृताच्या अतिरेकाचा न्हाणीमधून सुटणारा वास, पैसा मागण्यासाठी अंगस्पर्शापर्यंत महारोगी देखील करीत असलेली लगट, गलिच्छ दाट वस्ती व आसमंतात् पसरलेली घाण, श्राद्धे व दर्शने ह्यांमुळे जेवणास होणारा नित्य अवेळ, वाटेवरचे व क्षेत्रींचे दुकानदार विकीत असलेला भेसळीचा, निकस आणि कुपथ्यकर शिधा, ही सर्व एकवटली म्हणजे आरोग्य कसें रहावें व वाढावे ? यात्रा करून धडधाकट परत येणे मुष्किलीचं समजतात तें यथार्थ आहे ! हिंदूंचे जे प्रधान पवित्रस्थान काशी ती बेसुमार कोंदट व घाण असावी, ही हिंदू म्हणविणाऱ्या प्रत्येक इसमास मोठ्या शरमेची गोष्ट आहे. निदान ती तरी नमुनेदार, खुलावट, स्वच्छ आणि सर्वतोपरी आरोग्यदायक व दर्शनीय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली देवालये, तीर्थ व क्षेत्रे निरोगी करण्यासाठी ज्या त्या समाजाने झीज सोसणे व जरूर ती वर्गणी उभारणे अवश्य आहे. आणि शेकडोंशें मंदिर बांधण्यांत, सांड ( देवाचे नांवाने सोडलेली जनावरें ) वाढविण्यांत, व कुपात्री दानांत जो पैसा जातो तो अशा उपयुक्त कामांत खर्च करण्याची सुबुद्धि आमचे लोकांना होईल तो सुदिन म्हणावयाचा !!

 विद्वान्, साधु इत्यादींना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करण्याचा प्रशस्त प्रघात आमच्यांमध्ये अनादि आहे असे म्हटले तरी चालेल. पुढे पुढे मागेल त्याला-मग तो विद्वान् असो किंवा टोणपा असो, निरीह संत असो किंवा 'लोक म्हणती बुवाबुवा । न कळे गुलामाचा कावा॥' अशा कोटीतला असो-द्रव्य देणे ह्यांतच पुण्य आहे अशी लौकिक समजूत होत गेली; आणि तिने भिक्षुकवृत्तीचा मूळ बांध फोडून वतनदार तीर्थोपाध्यांखेरीज सर्व जातींच्या आळशी, लतकोडगा, आयतखाऊ लोकांना ह्या फुकट्या धंद्यांत लोटलें. श्रीविश्वनाथाच्या मंदिराचे उदाहरण घ्या. त्याच्या आंत बाहेर नाना प्रकारच्या देवदेतांनी असा वेढा देऊन नाके-