पान:गांव-गाडा.pdf/309

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८६      गांव-गाडा.

सट्टेबाज उपाध्यायांना वेदमुख करा व त्यांच्या दक्षिणेची किमान अल्प इयत्ता ठरवा. धर्माध्यक्षांची हुकमत ह्या गोमुखव्याघ्रांवर चालत नसेल तर शास्त्रांनी धर्माचे नांवावर लोकांची अशी नागवणूक करणे म्हणजे खाटिकवाड्यांत शेळ्या हांकून लावण्यासारखे आहे.

 जातां जातां दुसऱ्या एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. पूर्वी थोडेससे कर्मठ लोक पायदळ किंवा बैलगाडीने प्रवास करून अन्यक्षेत्रस्थ देवांवर गंगाजल आणून घालीत, आणि त्यांच्या सोईसाठी अशी सवलत निघाली असावी की पारोशाचा किंवा हिंदु गाडीवान वगैरेंचा स्पर्श झाला तरी गंगाजलाला बाट नाही. परंतु त्याचा अर्थ असा नसावा की, त्याला अति शूद्र, म्लेंच्छ, ऋतुमती स्त्रिया किंवा सुतकी जन ह्यांचा स्पर्श झाला तरी तें देवाच्या अभिषेकाला चालते. असे असेल तर सध्या जे हजारों लोक--विशेषतः उत्तर हिंदुस्तानांतले गांवढेकरी व चोहोंकडचे साधू गंगाजलाच्या कावडी किंवा भांडी आगगाडीने नेऊन गयागदाधर, वैजनाथ, रामेश्वर, त्र्यंबकेश्वर वगैरे अनेक क्षेत्रस्थ देवांवर अथवा इतर घरच्या दारच्या उपास्यदेवदेवतांवर रिचवितात, हे विधिवत् की अन्यथा आहे ह्याचा कोणी आचार्यांनी विचार केला आहे काय ? नसल्यास जरूर करावा आणि आगगाडीने गंगोदक नेण्यामध्ये अज्ञ लोकांच्या कालाचा, पैशाचा व मेहनतीचा जो दुरुपयोग होत आहे तो होऊ देऊ नये.

 तीर्थे, क्षेत्रे करून मानसिक अगर आध्यात्मिक उन्नति पदरांत पाडून घ्यावी तर तिला उपरिनिर्दिष्ट परिस्थिति किती योग्य व उपकारक आहे, ह्याचा निर्णय ज्याचा त्यानेच करावा. त्यांकडून शारीरिक उन्नतीला मदत होईल असे म्हणावें तर तसे घडणें सर्वथैव अशक्य आहे. सरसकट रोगी-निरोगी यात्रेकरूंच्या डोक्यावर चालविलेले वस्तारे, तीर्थांचे आसपास पडलेले केंसाचे ढीग व मलमूत्रविर्सजनाची दुर्गंधि, सर्व प्रकारच्या लाखों यात्रेकरूंनी स्नाने करून व पिंड सोडून खराब झालेले बहुतेक कुंडांचे व फल्गूसारख्या नद्यांचे पाण्यांत स्नान, हजारों रुपये मिळत असतांही पंड्यांनी प्रयागचे सरस्वतीकुंड, काशीची ज्ञानवापी, मणिकर्णिका इत्यादि व फल्गुचे झिरे वगैरे