पान:गांव-गाडा.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७४      गांव-गाडा.

रणेसंबंधानें सरकारी व खाजगी रीतीने प्रसिद्ध होणारी माहिती वगैरेंची ओळख विद्यार्थ्यांस तसेंच गांवकऱ्यांस शिक्षकाने करून द्यावी, आणि शेतकी खात्याची त्यावर देखरेख असावी. शेती सुधारण्यासाठी सर सासून डेव्हिड ह्यांनी सरकारापाशी टोलेजंग देणगी दिली आहे. वर दर्शित केलेल्या नमुन्यावर शाळा काढण्याकडे जर तिचा उपयोग केला तर किती तरी बहार होईल!

 गुन्हेगार जातींची मुलें व भल्या जातींतील अल्पवयी गुन्हेगार ह्यांचा प्रश्न फार बिकट आहे. 'बीज तसा अंकुर' आणि 'बाळा तें जन्म काळा' हे सिद्धांत पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांच्याही अनुभवास उतरले आहेत. पूर्वजांचे गुणदोष मुलांत वंशपरंपरेनें उतरतात; आणि लहानपणी ज्या खोडी लागतात, त्या मरेपर्यंत सुटत नाहीत. तेव्हां निर्ढावलेल्या गुन्हेगारांपासून अल्पवयी गुन्हेगार दूर ठेवणे जितकें जरूर आहे तितकीच गुन्हेगार जातींच्या मुलांची व त्यांच्या आईबापांची थान-तोडही जरूर आहे. व्हिक्टर ह्यूगोनें असें गणित बसविलें आहे की, एखाद्याला सुधारणे झाल्यास त्याच्या आजापासून सुरुवात केली पाहिजे; म्हणजे आनुवंशिक गुणदोष निदान तीन पिढ्या तरी राहतात. गुन्हेगार संतान निपजू नये म्हणून निसवलेल्या गुन्हेगारांना खच्ची करण्याचा प्रयोग अमेरिकेंत चालू आहे. ह्या विषयाचें महत्त्व ओळखून सरकार गुन्हेगार जातींच्या मुलांच्या स्वतंत्र शाळा काढीत आहे. भल्या जातींतल्या ज्या अल्पवयी तरुणांच्या हातून संगतिदोषाने किंवा अप्रबुद्धपणाने गुन्हा घडला असेल त्यांना निर्ढावलेल्या गुन्हेगारांचा संपर्क लागू देता कामा नाही. अशा अल्पवयी गुन्हेगारांसाठी सरकारने थोड्या फार शाळा घातल्या आहेत, आणि त्याबद्दल तें धारवाड येथे बोर्स्टल पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून पाहात आहे. गुन्हेगार जातींच्या मुलांच्या व अल्पवयी गुन्हेगारांच्या शाळांचा एक मोठा उपयोग करून घेता येईल. येवले, भिंगार, पाथर्डी, संगमनेर, पैठण अशा ठिकाणी विणकामाचा धंदा जोरांत आहे; तेव्हां तेथल्या प्राथमिक शाळांत ह्या धंद्यांचे ज्ञान दिले तर चांगले. शेतीव्यतिरिक्त दुसरा