पान:गांव-गाडा.pdf/298

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २७५

धंदा भरभराटीत असलेली गांवें फार थोडी आहेत. म्हणून कुणबीक हा प्रधान धंदा धरून खेड्यांतल्या शाळांचा शिक्षणक्रम मुक्रर केला पाहिजे. असली अटक गुन्हेगारांच्या शाळांना नाही. गुन्हेगार जातींना प्रतिष्ठित जातकसब मुळीच नाही. नवट जमिनीमध्ये वाटेल ती सोय व उदीम काढतां येतात. सुधारलेल्या आउतांचा कुणब्यांमध्ये प्रसार होण्याला मुख्य अडचण ही आहे की, त्यांचा एक खिळा निघाला किंवा टांचा उसवला तर गांवच्या सुतार-लोहार-चांभारांना तें काम नीट करता येत नाही. सुधारलेली हत्यारे नवीन व दुरुस्त करणाऱ्या कसब्यांचा गांवोगांव भरपूर पुरवठा करण्याची सोय झाल्यावांचून आमची शेती व दुसरे धंदे ह्यांची उन्नति होणार नाही. ह्या शिक्षणाची सोय गांवगन्नाच्या शाळेत होणे आज तरी अशक्य दिसते. निदान ते अशक्य नसले तरी मनस्वी खर्चाचे आहे, आणि इतका खर्च करण्याला लोकलबोर्ड-म्युनिसिपालिट्यांसारख्या संस्थांना आज सवड आहे असे दिसत नाही. गुन्हेगारांच्या शाळांत जर हें शिक्षण मुख्यत्वे दिले तर अशा शिक्षितांना पटापट काम मिळून चांगली पैदास होईल, व गुन्हा करण्याची हुक्की फारशी येणार नाही; आणि कुणब्यांचीही अडचण व गैरसोय दूर होईल. कामकुचरपणा, उद्यांची पर्वा न करणे, दुसऱ्यावर विसंबणे, कामाचा बाट धरणे, उत्कृष्ट कामकरी बनण्याच्या महत्वाकांक्षेचा अभाव वगैरे जे दोष आमच्या मजुरांत दिसतात, ते घालविण्याचा प्रयत्नही ह्या शाळांत नेटाने झाला पाहिजे. दिलेल्या चित्रांत दुरस्ती करणे आणि कोऱ्या कागदावर नवीन चित्र काढणे ह्यांत जें अंतर आहे, तेंच विवक्षित परिस्थितींत वाढणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि मनांत आणूं ती परिस्थिति निर्माण करूं अशा स्थितीत वाढणाऱ्या मुलांचे शिक्षण ह्यांत आहे. तेव्हां ह्या वहिमी मुलांच्या शाळा देशाला जितक्या प्रकारे उपकारक होतील तितक्या कराव्या अशी सरकारास नम्र विनंति आहे.

 क्वचित् असे घडते की, गुन्हेगार जातींच्या लोकांनी प्रामाणिकपणाने उद्योग करण्याचे मनांत आणिलें तरी त्यांना कोणी जवळ करीत नाही.