पान:गांव-गाडा.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २७३


विद्यार्थ्यांच्या आंगी आणिली पाहिजे, म्हणजे शाळेतील अभ्यासाच्या साह्याने ते आपले ज्ञान पुढील आयुष्यक्रमांत वाढवू शकतील, आणि आपली कल्पना चालवून नवीन सुधारणा अगर शोध करू शकतील. शाळेमध्ये हात, पाय, डोळे, बुद्धि ही सर्व उपयोगांत आणण्यास शिकविले पाहिजे; म्हणून सामान्य ज्ञानाचे प्रयोग विद्यार्थ्यांच्या हातून करून घ्यावेत, आणि त्यांना सुतारकी वगैरेंची हत्यारे फुकट व मनमुराद वापरण्यास मिळावीत. हा इतका शिक्षणक्रम फार तर तीन चार वर्षांत वांटून द्यावा; आणि त्याचे वाङ्मयात्मक शिक्षण (ह्यांत सामान्य ज्ञानाच्या सप्रयोग शिक्षणाचा अंतर्भाव होत नाही. ) शाळेंत सुमारे रोज तीन तास एकसांज द्यावे, म्हणजे मुलांना एकसांज आपल्या आईबापांना शेतांत किवा दुसरीकडे मदत करण्यास व आपला पिढीजाद धंदा प्रत्यक्ष काम करून शिकण्यास वेळ सांपडेल. असले शिक्षण समजण्याला विद्यार्थ्यांचें वय अगदीच लहान असतां उपयोगी नाही. तें निदान गुराखी पोराइतकें म्हणजे ८ ते १२ वर्षांचे असावें. रोथामस्टेड पद्धतीने शेती शिकविली तर फार थोड्या जमिनीवर काम भागतें. पूर्व प्रशियामधील मारग्राबोवा येथील शाळेत १५९ विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण देण्यास सुमारे एक एकर जमीन बस्स होते. प्रत्येक शाळेला एक शेत द्यावें, आणि त्याची सर्व कुणबीक मुलांकडून करवून घ्यावी, इतकेच नव्हे तर त्यांतील माल विकण्याला देखील मुलांना बाजाराला पाठवावें. त्याचप्रमाणे डागडुजीपुरती सुतारकी, लोहारकी, चांभारकी, मुलांना शिकविण्याची तजवीज व्हावी. हें शिक्षण देणारे शिक्षक तयार होईपर्यंत निरक्षर पण वाकबगार शेतकरी, सुतार, लोहार वगैरे गांवचे जातकसबी इत्यादिकांकडून ते देण्याची सोय झाली तरी देखील आडला गाडा पुढे ढकलल्यासारखे होईल. ह्या कारूना व्याख्या वगैरे न आल्या म्हणजे पुस्तकी ज्ञान नसले तरी ते आपले कसब काम कामाचा गुरु ह्या प्राच्य शिक्षण-पद्धतीने नामी शिकवितील. लिहिणे वगैरे एकसांज आणि कुणबीक व तिच्या अंगभूत धंदे ह्यांचं शिक्षण दुसरी सांज ह्याप्रमाणे अभ्यासाची वाटणी करावी. शेतकीसुधा-