पान:गांव-गाडा.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६८      गांव-गाडा.

सान होतें ते होणार नाही. ह्याप्रमाणे रोकडीचा व्यवहार झाला तरी त्यांतली उधारी मोडल्याशिवाय खेडी सांवरणे अशक्य आहे. रोकडीने कुणबी व कारूनारू ह्यांची जखडबंदी सैलावेल इतकेंच. पण 'हा दाम व हें काम' अशी रोखी सुरू झाली तर मात्र कुणबी व कारूनारू हिशेबी बनतील, उभयपक्षी खरी पोट-तिडक लागेल, आणि 'उधारीचे खातें सवा हात रितें' ही खेड्यांतली रड-कथा पुष्कळ कमी होईल. फिरस्त्यांच्या दाभाडांतून सुटून कुणबी कारूनारूंशी 'रोख भाई ठोक' असा व्यवहार करूं लागला म्हणजे तो आपला बाजारही रोखीने करण्यास शिकेल, आणि त्याचा खात्रीने फायदा होईल. सध्या यात्राच यात्रा बोकाळल्या आहेत. त्यांत गांवकरी फुकट खर्चाच्या भरीस सालोसाल पडतात, आणि लुच्चे, सोदे दुकानदार गिऱ्हाइकांना बुडवितात. ह्यासाठी यात्रांची संख्या कमी झाली पाहिजे, म्हणजे त्याबरोबरच परधर्मातले देव, उत्सव व त्यांचे भक्त हेही हटतील. ख्यालीखुशाली, अन्नसंतर्पण ह्यांसाठी पूर्वीचे राजे यात्रांना नेमणुका देत होते. आतांचे सरकार ज्ञानार्जनासाठी काय ती मदत देते. तिचा फायदा घेऊन कलोत्तेजन, ज्ञानसंपादन, व मनोरंजन ह्यांची पीठे यात्रा कशा करतां येतील यासंबंधानें दुकानदारी ह्या प्रकरणांमध्ये सूचना केल्या आहेत, त्यांचा जरूर तो विचार व्हावा.

 हिंदुस्थानांत सध्या अजमासाने शेकडा ९४ लोक निरक्षर आहेत, आणि शाळेत जाण्याजोग्या शंभर मुलांपैकी सुमारे १७।१८ काय ते शाळेत जातात. जोपर्यंत कुणब्यांना व अडाण्यांना तिसरा डोळा नाही, तोपर्यंत ग्राम-सुधारणा हा विषय निव्वळ मनोराज्यांत वावरणार. सरकाराने आजपर्यंत मिळविलेल्या व प्रत्यही मिळवीत असलेल्या नानाविध माहितीवरून आमचा समाज सुधारणेच्या कोणत्या पायरीवर आहे ही गोष्ट बहुजनापेक्षां सरकारला जास्त स्पष्ट झाली आहे. सरकाराने चलन दिल्याशिवाय लोक आपापली इष्ट सुधारणा करतील असे म्हटले तर बहुतेक कपाळाला हात लावून कालक्रीडेकडे टकमक पहात बसण्याची पाळी येणार आहे. तेव्हां वरील योजना अमलांत येण्यासाठी सरकाराने आमचा पांगुळ-