पान:गांव-गाडा.pdf/290

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २६९

गाडा हाकला पाहिजे. सर्व धंदे जातिधर्म होऊन बसल्यामुळे एका जातीच्या इसमाला दुसरीच्या धंद्यांत प्रवेश करण्यास पुष्कळ अडचणी येतात. सबंध इलाख्यांत कलाभुवनें हाताने मोजण्याइतकी देखील नाहीत ! आणि त्यांतही नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश !! धंदा शिकण्याला सुतार, लोहार, चांभाराकडे तदितराने जावें तर ते म्हणणार की 'तुम्ही आपला वडिलार्जित धंदा करा, आमचा धंदा हिरावून घेऊन आम्हांला भीक मागावयाला लावणार की काय? ब्राह्मणाला सुतार-कारकुनाचे बरें वाटत नाही, कुणब्याला ब्राह्मण-नांगऱ्या खपत नाही, शिंप्याला सोनारशिंपी पहावत नाहीं; फार काय खिस्ती झालेले महारसुद्धां मांगांना गुरें ओढूं किंवा फाडूं देत नाहीत ! ह्याप्रमाणे कोणीही आपलें कसब इतरांला दाखवीत नाही. जोपर्यंत वाटेल त्याला वाटेल तो धंदा शिकण्याला साधनें मुबलक नाहीत, तोपर्यंत लोक जातधंदा सोडीत नाहीत ह्याबद्दल त्यांना दोष देतां येणार नाही. सरकाराने शाळा काढून कारकुनी धंद्यात ब्राह्मणेतर जातींचा शिरकाव होण्याची तरतूद केली आहे.परंतु तीही अद्यापि यशस्वी झाली नाही. शाळेत मुलें घालणे हे आपल्या पिढीजाद धंद्यापेक्षा जास्त किफायतशीर असेल तरच ब्राह्मणेतर आपली मुले शाळेत घालतील. तशी किफायत होण्याला त्यांच्या डोळ्यांसमोर जे साधन दिसतें तें सरकारी नोकरी होय. ती मिळण्याइतकें शिक्षण देणाऱ्या शाळा सबंध तालुक्यांत फार तर दोन क्वचित् तीन असतात. तेव्हां पुरतें लिहिणे येणे आपल्या आटोक्याबाहेर आहे असे म्हणून निरक्षर जाती आपली मुले शाळेत घालण्याच्या भरीस पडत नाहीत. पुष्कळांचा असा अनुभव आहे की, दिवसांतून पांच सहा तास शाळेच्या सावलीत बसल्यामुळे रानांत हिंडणाऱ्या मुलांपेक्षां शाळेत जाणारा नरम पडतो, त्याला ऊन्ह-वाऱ्यांत, थंडी-पावसांत काम करण्याचा सराव लागत नाही, अंगमेहनत करण्याची लाज वाटते, व त्याची मिजास वाढते. इकडे लिहिणे पुरे झाले नाही म्हणून नोकरी मिळत नाही, तिकडे मळखाऊ शेतकाम, सुतारकी, मजूरी, पायपीट वगैरे होत नाही, व खर्च मात्र अधिक करावासा वाटतो, आणि त्याच्या निरक्षर बंधूंचा प्रपंच त्याच्यापेक्षा चांगला चालतो. सबब निराक्षरापेक्षां साक्षरांचा संसार जास्त