पान:गांव-गाडा.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २६७

सबब पहिल्या ओळीचे कारू आज निव्वळ कुणबिकींचें काम (ह्यांत इतर कारूनारूंच्या व गांवकीच्या कामांचा समावेश अगदीं करूं नये.) किती करतात, ते कोणत्या प्रतीचे करतात व ढळत्या अंदाजाने त्याची मजुरी काय होते, ह्याचा हिशेब करावा; आणि त्या निरखाबरहुकूम कुणब्याने बलुतें द्यावे, अशी स्थिति निर्माण केली पाहिजे. गांवकऱ्यांना शेतकी सभांनी ह्या कामांत समज व मदत दिल्यास त्यांचे डोळे उघडून ते आपला फायदा करून घेतील. ह्या ठरावाव्यतिरिक्त कुणब्याने एक चुई कारूंना देतां उपयोगी नाही. ह्याप्रमाणे 'चाकरी आणि भाकरी' ह्यांची हिशेबी सांगड घालून दिली म्हणजे आज जें महार, मांग, भील, रामोशी ह्यांचें पेंढार आणि कामांपेक्षा सुतार, लोहार, चांभार ह्यांचे संख्याधिक्य गांवोगांव दृष्टीस पडतें ते ओसरेल, आणि कामाच्या मानानें कामकरी राहिले म्हणजे सर्वाना भरपूर काम व पोटभर दाम मिळून कुणब्याच्या मागचे जंजाल तुटल्यासारखे होईल.

 रात्र फार झाली व कथळ्याचा निकाल लागला नाही, ह्मणजे काही काही जंगली जाती तो पाटीखाली झांकन ठेवतात; व दुसऱ्या दिवशी फिरून पंचायत जमली ह्मणजे पाटी उघडून तो अपुरा राहिलेला वाद पुनः सुरू करतात. तशी अवस्था वरील योजनेने होणार आहे. कुणबी आणि कारूनारू ह्यांचा व्यवहार रोकडीचा झाल्याशिवाय तो चोख हाणार नाही. जे कुणबी रोकड पैसा देऊन बलुत्यांकडून कामें करून घेतात, ती त्यांना मनस्वी स्वस्त पडतात. तेव्हां ज्यांना शक्य त्यांनी ताबडतोब रोकडीने बलुत्यांची कामें घेण्यास सुरुवात करावी. ऐनजिनसी बलुत्यापेक्षा शेतमालाचे टक्के करून जर कुणबी कारूनारूंना देईल तर पैसा मोडण्याची पाळी आल्याने तो जास्त चौकस होईल. खेड्यांत पैसा दृष्टीस पडल्यामुळे कारूनारू काम जास्त आस्थेनें करतील. 'कमी आलें जास्त गेलें' अशी दोघांचीही तक्रार उरणार नाही, आणि आलुत्याबलुत्यांना शेतमालाची किंमत नसल्याने तो ते वाटेल तसा वाण्याला घालतात व त्यामुळे धान्याचे भाव उतरून कुणब्याचे जें नुक-