पान:गांव-गाडा.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २५९

उत्पन्न झाला. राजानुशासनाचा संबंध नसतांनाही असल्या सामाजिक व धार्मिक स्थितीमुळे गांवगाड्यांत रेटारेटी सुरू झाली; आणि बहुतेक भार कुणब्यावर पडून कारूंची सोय होणार असल्यामुळे कुणबी नको म्हणत असला तरी इतरांनी त्याचे म्हणणे मोडून काढून वतनदारांच्या भरतीला वरचेवर उत्तेजनच दिले. तिला विरोध करण्याइतकें तेज त्यामध्ये न उरल्यामुळे म्हणा, किंवा आपण किती भार उचलतों ह्याचा उमज त्याला न पडल्यामुळे म्हणा, किंवा माझ्यांत सर्व दुनियेचा वाटा आहे ह्या धर्मसमजुतीने म्हणा, कुणबी हटतच गेला. अशा रीतीने गांव-गाड्यांत कारूंना नारू येऊन मिळाले आणि दोघांचेही लटांबर उमाप फुगून तो कुणब्याच्या बाजूनें पार एकारला. ह्या सबंध खोगीरभरतीवरून नजर फिरविली तर काळीच्या उत्पन्नाच्या वाटणीसंबधाने कुणबी गाय आणि कारूनारू तिला झालेली खऱ्या कळकळीची वासरे हे नाते नांवाला मात्र राहिले, आणि सर्व अडाणी कुणब्याला तोडण्याच्या कामी एक होऊन त्याला हात आंखडू देईनातसे झाले. कुणब्याचा समाज अफाट आणि पांगलेला असल्यामुळे त्याला अडाण्यांना प्रतिरोध करितां येईना; इतकेच नव्हे, तर त्यांजकडून जें आपलें काम करून घ्यावयाचें तें सुद्धां चोख व वक्तशीर करून घेण्याची ताकद व जूट त्यांत राहिली नाही, आणि तो एकसारखा चेंगरत गेला. 'तोबऱ्याला पुढे व लगामाला मागें' असे होऊन कुणब्याच्या कामाची अडाणी टंगळमंगळ करूं लागले, तरी त्याला त्यांचे हक्क पुरे-नव्हे वाढत्या प्रमाणांत-चुकते करावे लागतात. कुणबिकीवर ताव मारण्याला जरी सर्व अडाणी एक होत; तरी जातिभेदामळे एका जातीचे वतनदार दुसऱ्या जातीच्या वतनदारांपासून अलग राहिले, व एकंदर गांवाच्या सामान्य हिताकडे न पाहतां आपापल्या विशिष्ट हितावर नजर देऊ लागले.जातकसबामुळे एका घरीं केणे येऊन एकमेकांना एकमेकांची मनें सदैव राखणे दुरापास्त झाले. तेव्हां जरी सर्वजण गांवगाड्यांत शिरले तरी त्यांचे हितसंबंध एक राहिले नाहीत, एवढेच नव्हे तर अनेक बाबतीत हितविरोध व मत्सरही सुरू झाला. आणि त्याच्या सर्वांग डागडुजीकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे