पान:गांव-गाडा.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६०      गांव-गाडा.

तो खिळखिळा झाला. कोणत्याही कारणानें कोणाचे उत्पन्न वाढले, म्हणजे दुसरा त्याच्याकडे पाहून हाय हाय करतो. महारांनी गांवच्या ढोरांनाच कातडें विकलें तर समस्त गांवाला कातडी काम स्वस्तांत पडेल. स्वहितासाठी महार तें व्यापाऱ्यांना विकतात, आणि रगड पैसे मिळवितात. ते महाग झाल्यामुळे चांभारांना कूस कमी राहते, आणि ते कुंथत बसतात की, महारांसारखे दैववान कोण आहे, चांभाराचे जिणे फार वाईट. असो. सामान्य हिताविषयी बेपरवाई आणि एकमेकांचा हितविरोध निर्माण झाल्यामुळे गांवगाड्यांत जरी पुष्कळ भरती झाली, तरी तो धडधाकट ठेवण्याची कळकळ, व त्याच्या उट्या काढण्याची खटपट व ताकद त्याच्या भरितांतून व्यक्तिशः व समुच्चयाने नाहीशी झाली. पाटलाच्या पोटांत शिरून शेटजी त्याच्या पडवीत दुकान लावून अखेर पाटीलगढीचा धनी कसा होतो, ह्याचे हृदयंगम वर्णन लोक गांवोगांव करतात. व्यापाऱ्यांना सवलतीने व सच्चेपणाने व्यापार करण्याचे भाग पाडण्याइतकी जूट, अक्कल, नेट व प्रामाणिकपणा, गांवकऱ्यांत नसल्यामुळे दक्षिणेतली पुष्कळ गांवें सावकारांच्या घशांत उतरली. आणि त्यांचाही करडा अमल कुणबिकीवर गाजू लागला. 'बळी तो कान पिळी, ' ह्या न्यायाने सर्व थोतांडी व गुन्हेगार लोक व जमाती ह्यांनाही मोकळे रान सांपडून त्यांनी गांवगाड्याची विचकाविचक, व मोडतोड केली. आज जे दुराचारी व शिरजोर स्वधर्मी परधर्मी भिक्षुक हिंदु गांवकऱ्यांकडून हक्काने उकाळा करतात, आणि ज्या अनेक आडदांड चोरट्या, स्थाईक अगर फिरत्या जमाती हक्काने खळी उकळतात, त्याचे कारण असें आहे की, त्यांच्या अपहारास बंदी करण्याचे सामर्थ्य समाजांत, धर्माधिकाऱ्यांत, व पूर्वीच्या राजेरजवाड्यांत नव्हते. तेव्हां एकंदर हिंदु समाजाची गांवापुरती चिमणीशी पण सर्वांग प्रतिमा जो गांव-गाडा त्यामध्ये पूर्वोक्त व्यक्ति व जमाती ह्यांना तोंड देण्याइतकी सत्ता कोठून येणार ? ह्याप्रमाणे घरचे, दारचे, पै, पाहुणे, कामकरी, आयतखाऊ, भले, बुरे, सर्वच गांव-वतनदार बनले; आणि अगोदरच खिळखिळा