पान:गांव-गाडा.pdf/279

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.
----------

 एकमेकां साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ ॥ तुकाराम.

 गांव-गाडा मूळ भरणारा कुणबी आणि वहाणाराही पण कुणबीच आहे. जसजशी राजकीय, सामाजिक, धार्मिक कामाकाजांत त्याला इतरांच्या साह्याची गरज पडली, किंवा त्याची व त्याच्या साथीदारांची लहर लागली; तसतशी भरितांची संख्या भडकतच चालली. जो आला तो कुणब्याच्या जागेतून जागा काढून बसला. जोपर्यंत कुणबी अकलेने व मेहनतीनें सावध आणि तो व आंगतुक असे दोघेही सारखे गरजू होते, तोपर्यंत ही भरती दोघांनाही उपकारक झाली, आणि कुणबी व कारूनारू ह्यांचे गोवत्साचे नातें चालू राहिले. कारूनारूंच्या संघांसारखे लहान लहान जनसमुदाय बहुधा अल्पप्रयत्नाने व अल्पकाळांत एकदिल होतात. परंतु कुणब्यासारखा विखरलेला जनसमाज आळेबंद राहत नाही, व त्याचा व्यवसाय लोकसंमर्दापासून फार तुटक असल्यामुळे तो चौकोनी न राहतां लोकव्यवहारांत अगदी लुळा पडत जातो. इतरांची मिळकत जशी झांकून तशी कुणब्याची उघडी असते. त्याचे पिकलेले शेत, सुडी व रास, सर्वांना पटकन दिसतात. त्यामुळे ज्याची त्याची प्रवृत्ति त्यांतून आपणाला जितके मिळेल तितके काढण्याकडे झाली, आणि कोणीही त्याला पारठे पडू देईना. जातिधर्म व जात-कसब ह्यांचे बंड माजत गेल्यामुळे कारूंच्या व्यवसायाला स्थिरता आली; इतकेच नव्हे तर ज्या त्या जातीची आपापल्या कसबाच्या कामांत इतरांवर कुरघोडी सुरू झाली. एक जात दुसरीच्या कामांत हात घालीनाशी झाली. ह्याचा परिणाम असा झाला की, जातकसब सोडून दिले तर प्रत्येक जात प्रपंचास जरूर अशा परजातीच्या कामांत गैरवाकबदार व परावलंबी झाली; आणि अमुक जात पोट जात किंवा पंथ नसला तर आपलें अमुक अमुक काम अडेल, ते कोणी करणार नाही, असा एकमेकांबद्दल भीतिभाव सर्वत्र