पान:गांव-गाडा.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भरित.

'षष्ठांशवृत्ति' हा राजाचा प्रतिशब्द होऊन बसला. हिंदु राजांचे अंमलांत काळी पुष्कळ आणि कुणबी थोड़े होते. तेव्हां गतकुळी अगर बेवारशी जमिनीची लागण जो करी, तोच तिजवर वारसा सांगे आणि सरकारला तिजबद्दल लढाई वगैरे धामधुमीच्या साली पिकाची चौथाई, आणि एरवींच्या सामसुमीच्या वेळी साहोत्रा देई. ह्याप्रमाणे करभार घेऊन राजे प्रजापालन करीत, ज्याला त्याला स्वकष्टार्जित संपत्तीचा भोगवटा घेण्याची सोय करून देत, आणि अपहार करणाऱ्या दुर्जनांचें पारिपत्य करीत. पुढे राजकारण वाढत जातां जातां मुसलमानी रिआसतींत जमिनीची पूर्ण मालकी राजाने आपल्याकडे ओढली असावी. कारण ' खलक खुदाका मुलख पादशहाका' (विश्व परमेश्वराचे आणि मुलूख राजाचा), 'बेटी बापाची जमीन बादशाहाची,' ह्याप्रमाणे लोक बोलू लागले. मुसलमानी राज्यकर्त्यांनी जमिनीची पहाणी व मोजणी करून सरकारसारा ठरविण्याचा प्रयत्न केला. तैमूरची वसूलपद्धति म्हणून काही ठोकळ नियम होते. शीरशहाने त्यांत सुधारणा करून जमिनीची आकारणी ठरविली. अकबर बादशहाच्या कारकीर्दीत राजा तोडरमल ह्यानें “ इलाही गज” नांवाचें जमीन मोजण्याचे प्रमाण निश्चित करून 'कानुगो' ( जमाबंदीचे मुख्य कामगार ) नेमले, आणि सर्व प्रांतांतील जमीनीचे वर्गीकरण व वसूलआकारणी केली. ह्या वसूलपद्धतीस 'असल-इ-जमा-इ-तुमार' असें नांव आहे, हिलाच दक्षिणेत 'तनखा' म्हणतात. पूर्वी तांब्याचा टक्का घेत होते. त्याऐवजी रुप्याचें तनखा नांवाचे नाणे घ्यावें असें ठरविलें म्हणून ह्या पद्धतीचें नांव तनखा असें पडलें. हिच्या अन्वयें कुलकाळी सरकारची ठरवून तिच्या उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा तीन प्रती लाविल्या, आणि रयतेने स्वामित्वाबद्दल चौथाई उत्पन्न नक्त द्यावें असा धारा घातला. राजा तोडरमल ह्याची कायम धारेबंदी लोकप्रिय झाली असा इतिहास आहे. इ. सन १६०७ ते १६२६ च्या दरम्यान निजामशाहीमधील सुप्रसिद्ध मुत्सद्दी, चांदबिबीचा विश्वासु नोकर,