पान:गांव-गाडा.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४०      गांव-गाडा.

आणि कामाची कोंडी होते. अस्पृश्य जातींतही एक जात दुसरीचा विटाळ धरते. चांभार महाराचे पाणोथ्याला जात नाहीत, महार मांगाच्याला जात नाहीत, इत्यादि. स्पर्शास्पर्श दोष कमी होऊ लागल्याला शेकडो वर्षे झाली. इर्जिकींत डफ वाजविणा-या मांगाचा विटाळ कुणबी धरीत नाहीत. बाजारांत, आगगाडींत किंवा जेथें हजारों मजूर जमतात, अशा एंजिनियरी कामावर ब्राह्मण पुरुष व ब्राह्मणेतर स्त्रीपुरुष शिवताशीव धरीत नाहीत. ब्राह्मण स्त्रिया मात्र ब्राह्मणेतर सर्व जातींचा विटाळ धरतात, परंतु पातळे चिटें वगैरेंनी तो संपुष्टांत आणिला आहे. स्पर्शास्पर्शतेचा दोष धर्मभयाने वाढविला तसा कमीही केला आहे. देवीचे भक्त, आराधी पोतराज, महार-मांग असले तरी ब्राह्मणेतर स्त्रीपुरुष त्यांना शिवतात, कुंकू लावतात, आणि हाताला हात लावून एकत्र देवीची गाणी म्हणतात. कारण विचारतां ते असे सांगतात की, देवी विटाळ धरूं देत नाही. शाक्तांत मांगिणीची पूजा आहे. कित्येक ठिकाणी ब्राह्मणेतर हिंदू ताबुतांत फकीर होऊन मुसलमानांच्या हातची कच्ची रसई खातात; आणि अहमदनगराकडे मढी, जानपिराची यवलवाडी येथे हिंदूमुसलमानांची एक पंगत होते. जीवनकलह व शिक्षणप्रसार ह्या दोहोंच्या माऱ्यामळें स्पर्शास्पर्शभाव व्यवहारांत दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, आणि तो अजीबात नाहीसा होण्याची सुचिन्हें दिसत आहेत. तर हीच भवितव्यता आपण होऊन लवकर घडवून आणली तर आपली आणि आपल्या मानवबंधूंची दिलजमाई होऊन हिंदुसमाज सत्वर एकजीव हाण्याच्या मार्गाला लागेल. स्पर्शास्पर्शतेच्या स्तोमानें अस्पृश्य जातींना काही कामांची

-----

 १ दुष्काळांत गांवोगांव पिण्याचे पाणी आटले म्हणजे चांभार, महार, मांग ख्रिस्ती वगैरे प्रत्येक जमात पहिल्याने निरनिराळी विहीर मागून पहाते. त्यांपैकी उंच म्हणविणाऱ्या जातीने आपला एक माणूस विहिरीवर ठेवावा, व त्याने सर्वांना पाणी उपवून घालावे, अशा दुमट्यात ते सांपडले म्हणजे वाटेवर येतात, व पृथक् विहिराची मागणी सोडून देऊन एकाच विहिरीवर पाणी भरूं लागतात !