पान:गांव-गाडा.pdf/262

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २४१

मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या उद्योगधंद्याचे क्षेत्र कमी झालें, व इतर जातींना एका कामकऱ्याच्या ऐवजी अनेक लावावे लागतात; अशी उभयपक्षी नाहक बुडवणूक होत आहे. ह्याखेरीज कामाच्या कोंडीमुळे वेळेला दाम देऊनहीं काम होत नाही, ते वेगळेच. तेव्हां स्वच्छता व शुचिर्भूतपणा ह्यांच्या अनुरोधाने अस्पृश्य जातींच्या मार्गांतली स्पर्शास्पर्शतेची उटी काढून टाकून त्यांना बारा वाटा मोकळ्या केल्याशिवाय आतां गत्यंतर नाही. स्पर्शास्पर्शाचा छाप ज्या जातींवर बसला आहे त्यांपकी बहुतेकांचा जातधंदा असा आहे की, त्यांत सडकून अहोरात्र मेहनत करण्याचे प्रयोजन नाही. बाळमित्र भाग १ पान २०९ 'थोरांचे हृदय' ह्या गोष्टीतील पुढे दिलेला संवाद त्यांच्या सद्यःस्थितीला पूर्णपणे लागू पडतो. “ गणोजी-नंतर त्याने माझे बेंडूस आपल्या मांडीवर बसविलें, आणि तो मला पुसतो तुमची मुलें काय करीत असतात. मी म्हटले काय करतील ? कोठे झाडाखाली जाऊन फुलें जमा करून आणतात, आणि त्यांचे तुरे करून विकतात. नाही त्या वेळेस काटक्या जमा करतात. तेही नाही त्या वेळेस भीक मागतात. तो म्हणाला छी छी! हे ठीक नाही. अशांत जीव नाही. ह्यांत ती आळशी आणि स्वच्छंदी मात्र होतील. तुम्ही मुलांस काही तरी एखादा धंदा शिकवा आणि मुलींस कोठे चाकरीस ठेवा.” सर्व धर्माच्या व जातींच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या, तेव्हां असें दिसून आले की, अस्पृश्य जातींतल्या मुलांचे पासाचे प्रमाण इतरांहून जास्त पडते व काहींचा नंबरही पुष्कळ वर येतो. ह्या जाती स्वभावतः ताकददार व वस्ताद असतात. ह्या गुणांचा योग्य उपयोग करण्यासारखा रोजगार त्यांना नसल्यामुळे त्या बेलगामी, उधळमाणक्या व स्वाभिमानशून्य झाल्या आहेत. त्यांना काम दिले तर त्या गमतात, व तें मन लावून करीत नाहीत. भिल्लरामोशांसारख्यासुद्धां स्पृश्य जातीतले लोक एकेक दिवस उपवास पडल्यावर मासे किंवा शिकार धरण्याला जातात. नियमित व पुरसे काम करण्याचा त्यांना सराव असता तर त्यांची अशी अवस्था होतीना. असो. तेव्हां स्पृश्यास्पृश्य जातींच्या लोकांना पुरेसें काम मिळ-