पान:गांव-गाडा.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २३९

 ढोर , चांभार, महार, होलार, मांग, हलालखोर, मांगगारोडी वगैरे जाती प्रमुखत्वें अस्पृश्य गणल्या आहेत. ह्यांखेरीज इतर कांहीं जाती अस्पृश्य समजत, पण त्यांचा विटाळ पुष्कळ कमी झाल्यामुळे त्यांचा नामनिर्देश करीत नाही. हिंदुस्थानांत अस्पृश्य जातींची लोकसंख्या जवळ जवळ सात कोटी आहे. ह्या जातींतले लोक ख्रिस्ती किंवा मुसलमान झाले म्हणजे त्यांचा विटाळ उडतो; व वरिष्ठ जातींचे लोक त्यांना आपल्या घरांत वागू देतात. परंतु जोपर्यंत ते हिंदू असतात तोपर्यंत त्यांना ते शिवत नाहीत, व दाराबाहेर उभे करतात. स्पृश्य पर जातींच्या हातचे पाणी ज्यांना आंघोळीला खपत नाही, त्यांना देखील अतिशूद्र मानलेल्या जातींच्या लोकांनी पाणी भरलेल्या बाटल्यांतले सोडावाटर पिण्याला चालतें. अस्पृश्य जातींत स्पृश्य जातींची बहुतेक आडनांवें व देवकें आढळतात; इतकेच नव्हे तर पंडीत, साठे, दळवी, काळे, गोरे, भांगरे, पानसरे,पाटणकर,भालेराव वगैरे ब्राह्मणांची आडनावेही त्यांमध्ये आढळतात व सर्वांचे एकत्व नसले तरी ममत्व व्यक्त करतात. स्पर्शास्पर्शदोषाचें वास्तविक मूळ कांहीं असलं तरी तो आतां चालू ठेवणे उभयपक्षीं अनिष्ट आहे. त्यामुळे अस्पृश्य जातींचा निरंतरचा पाणउतारा होतो, त्यांना आपल्या शारीरिक व मानसिक पात्रतेप्रमाणे सर्व धंद्यांत पडतां येत नाही,

-----

 १ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून लग्नमंडपाच्या मुहूर्त-मेढीला अगर देवघरांत देवक बांधण्याचा किंवा ठेवण्याचा कुलाचार महाराष्ट्रकर्नाटकात ब्राह्मणांंमध्ये तुरळक व ब्राम्हणेतरांमध्ये सार्वत्रिक आहे. तो काही काही गुजराती जातीतही आढळतो. उपजीविकेची इत्यारे सनंगें, पशुपक्षी, पाणी, मासे इत्यादीचे देवक असते. जी वस्तू ज्या कुळीची देवक असते तिला ती कुळी देवाप्रमाणे भजते, तिचा उपमर्द होईल असे कोणतेही कृत्य करीत नाही, आणि लग्नकार्यात देवप्रतिष्ठेपासून तो मांडवपरतण्यापर्यंत पूजते. गोत्र व देवक ह्यांचा उपयोग सारखाच आहे. सगोत्रांयांचे जसें लग्न होत नाही, तसें ज्या दोन कुळ्यांंचे देवक एकच असते, त्या आपणांला भाऊबंद समजून प्रायः एकमेकांशी शरीरसंबंध करीत नाहींत.