पान:गांव-गाडा.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २२५

आहेत. चांभाराचे जोडे मागे पडून जिकडे तिकडे देशी परदेशी बूट फैलावत आहेत. पण गांवच्या चांभारबोवांना कांहीं तें काम सुधरत नाहीं; इतकेच नव्हे तर मावळी चांभाराच्या वहाणा घाटी चांभारांना करतां येत नाहीत. जगाच्या आजच्या गरजा भागविण्यासारखे कारूनारू तयार करण्याची सोय खेड्याखेड्यांनी होणे दुरापास्त आहे. त्यांनी खेडी सोडलीच पाहिजेत, आणि नवीन विद्या शिकून आपला माल योग्य नफा घेऊन गांवकऱ्यांना मिळेल अशी तजवीज केली पाहिजे. तर त्यांचे पुढे चालेल. सारांश, कोणत्याही वतनदारांना आजच्या स्थितीत वतनापासून कायमचा फायदा आहे असे म्हणतां येत नाही.

 वतनपद्धतीमुळे वतनदारांचे व्यक्तिशः फार नुकसान झाले आहे. त्यांतील होतकरू मंडळीपैकी जरी कित्येक गांव सोडून अन्यत्र आपल्या बुद्धिवैभवावर आजपर्यंत कमाई करीत आले, तरी पुष्कळांची गात शेवग्याच्या झाडाच्या गोष्टीप्रमाणे झाली आहे. एक श्रीमंत कुटुंब दरिद्रावस्थेप्रत पोहोंचलें. त्यांच्या अंगणांत एक शेवग्याचे झाड होते. त्याच्या शेंगा गुजरींत स्वतः विकल्या तर आब जातो म्हणून त्या रात्री काढून ते एका माळ्याला विकीत, आणि गुपचिप तो देईल त्या किमतीवर गुजराण करीत. कुटुंबांत चार पांच भावांचा विस्तार होता. तेव्हां पाळीपाळीनें कित्येकांना उपवास काढावे लागत. एक दिवस त्यांचा सोयरा रात्रीं मुक्कामाला आला. त्याला व लहान मुलांना जेवण्यास बसविलें, व बाकीच्यांनी भूक नाही म्हणून वेळ मारून नेली. सोयरा निजला असें पाहून कारभाऱ्यानें नित्यक्रमाप्रमाणे शेंगा माळ्याला दिल्या, आणि त्यांचे दाम घेतले. सोयरा जागा होता. त्याला सर्व अवस्था अगोदर माहीत होतीच, आणि हा प्रकारही त्याने पाहिला. चार पांच धडधाकट भाऊ आज जे उपवास काढतात, ते या शेवग्यामुळे अशी त्याची खात्री झाली; आणि त्याने जिकडे तिकडे सामसूम झाल्यावर रात्रींतून झाड कापून न विचारतां आपले घराची वाट धरली. सकाळी घरांत जिकडे तिकडे हाहाःकार झाला. 'हगवणीला बायको आणि नागवणीला सोयरा' असे