पान:गांव-गाडा.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४      गांव-गाडा.

नसल्यामुळे व मुलांना परगांवी ठेवण्याची ऐपत फार थोड्या वतनदार पाटीलकुळकर्ण्यांना असल्यामुळे त्यांमध्ये अज्ञान फार असते, आणि तें सर्व गांवाला नडते. निरक्षर पाटील अनेक प्रसंगी परबुद्धीने चालून आपल्याला व आपल्या निरक्षर बंधूंना खोड्यांत टाकतात. तेव्हां पाटीलकुळकर्णी आपल्या मुलाबाळांच्या पदरांत वतनाची दौलत म्हणून दारिद्र्य, अज्ञान व दुर्गुण ह्यांखेरीज दुसरी कोणती टाकणार आहेत ? उद्योग न करतां व चोरीचपाटीने कुणब्याचा माल घरांत घालून संसार करण्यांत भिल्ल,कोळी,रामोशी, महार, मांग वगैरे निकृष्ट जातींच्या हलके गांवनोकरांना आज बरे वाटते. पण ही स्थिति किती दिवस टिकेल ? सर्व जग कांहीं आतां डोळे मिटून बसलें नाहीं. चोरी-चपाटीने, आळसाने किंवा लोचटपणानें प्रपंच चालवावा अशा भावनेने त्यांच्या सबंध समाजाला घेरणे ही मोठी नैतिक हानि आहे.उद्योग न करतां प्रपंच चालतो म्हणून ते आपल्या मुलांना शाळेत घालीत नाहीत, व हुन्नर शिकवीत नाहीत, हे अत्यंत शोचनीय आहे; आणि यांत ते भावी पिढीचे मोठे नुकसान करीत आहेत. बाजेवतनदारांचीही हीच स्थिति. कामापेक्षा व अकलेपेक्षा जास्त नफा पुष्कळांना मिळतो, यामुळे जास्त उद्योग करावा व ज्ञान संपादन करावे अशी ईर्षा ते धरीत नाहीत वडिलांनी पोट भरले तसे आपणही गांवावर पोट भरूं अशी त्यांची खातरजमा असते, आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा सुद्धा ते फायदा घेत नाहीत. वास्तविक त्यांची कामें मोठ्या कसबांची आहेत. ही कसबें जगांत झपाट्याने वाढत आहेत, आणि परकी लोकांच्या त्यांवर उड्या पडत आहेत. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, परीट वगैरे जी हत्यारें आजकाल वापरतात त्यांकडे पाहिले म्हणजे असे दिसून येते की, सर्वांजवळ परदेशी हत्यारांचा भरणा झाला आहे. ती सर्व आपल्या देशांत, नव्हे, गांवोगांव होत होती. पण कारूनारुंच्या अज्ञानामुळे व निरुद्योगामुळे त्यांत सुधारणा झाली नाही, व ती मागे पडली. हीच अवस्था त्यांच्या कसबांच्या कामांची होऊन बसली. कारूनारूंनी तयार केलेली आउतें निरुपयोगी ठरून कुणबी सुधारलेली आऊतकाठी घेण्याच्या मागे