पान:गांव-गाडा.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६      गांव-गाडा.

म्हणतात. ह्या सोयऱ्याने तर दहा पांच मण धान्य पाठविण्याच्या ऐवजी अर्थ कोर भाकर देणारा शेवगाही तोडला, म्हणून सर्व त्याला शिव्याशाप देऊ लागले. तो दिवस कसा बसा गेला, आणि रात्री सर्व कुटुंब एकत्र जमून त्यांनी विचार काढला की, आतां घर सोडले पाहिजे. सर्व भाऊ घरंदाज व चांगले असल्यामुळे त्यांना रोजगार लागले, आणि वर्ष दोन वर्षांत घर सुधारले. नंतर सर्वजण दिवाळीला घरीं जमलेले पाहून तो सोयराही मुद्दाम तेथें आला, तेव्हां सर्वांनी त्याचे पाय धरले, व कबूल केलें की, तुम्ही झाड तोडले नसते तर आम्हांला घर सुटतेंना व आमचे दारिद्म जन्मभर फिटतेना. ही गोष्ट लागू पडणार नाही, असें वतनदारांचे एकहीं घर सांपडणार नाही. घरच्या घरी राहून शक्य असेल तें तेथल्या तेथे मिळवून कसा तरी कालक्षेप करावा, 'अर्धी सोडून सगळीच्या मागे जाऊं नये', ही प्रवृत्ति पुष्कळ होतकरू वतनदारांत बलवत्तर असते. ह्यामुळे त्यांच्या गुणांचा फायदा त्यांनाही मिळत नाही, आणि एकंदर जनतेलाही मिळत नाही. ठशांचे काम करणारा एक गुणवान् वतनदार तांबट पाहिला. तो जर मुंबईसारख्या शहरांत असता, तर चार पांच रुपये रोजाखाली जाता ना. पण त्याच्या वतनाच्या गांवीं त्याला अंग झांकण्याइतकें सुद्धा वस्त्र भेटेना. गांव का सोडीत नाही म्हणून प्रश्न केला तेव्हां तो म्हणाला, गांव सोडलें आणि वहिवाट मोडली म्हणजे माझ्यामागे पोराबाळांना कोणी विचारणार नाही. वतनदार पाटीलकुळकर्णी व कारूनारू ह्यांच्या घराण्यांत आज किती तरी उमेदवार सुग्रण लोक याप्रमाणे खिजबत पडले आहेत ! पूर्वीच्या दामदुकाळ काळांत हुषार लोकांचे अशा प्रकारे होणारे व्यक्तिशः नुकसान जाणवत नसे. आतां तें ज्याचे त्याला तर जाणवतेंच, पण लायक लोक मागे राहून नालायक लोक त्यांची जागा घेतात हे पाहून अतिशय वाईट वाटते. वतनपद्धतीचे अभिमानी यावर असें म्हणतील की, हे सर्व जरी खरे मानले तरी एकंदरीत वतनपद्धति फार सोईस्कर आहे. रोखीने व्यवहार करण्यासाठी कुणब्याजवळ अगर इतर गांवकऱ्यांंजवळ वेळेवर धान्य किंवा पैसा असतो कोठे ? कुणब्याचा