पान:गांव-गाडा.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २१७

निरनिराळ्या अवयवांतील गुणावगुण सर्व समाजभर पसरतात. 'आपलेच ओठ आणि आपलेच दांत' व 'तोंड दाबून बुक्कयांचा मार' असली तक्रार झाडून सर्व जातींचे व सर्व धंद्यांचे गांवढेकरी परस्परांविरुद्ध करतात. ज्यांना पोटभर काळी आहे, असे कुणबी थोडे. तितकी नसणारे फार. अशांमध्ये ज्यांना जास्त प्राप्ति मिळण्याचा संभव आहे, ते गांव सोडतात, आणि बाताबेताच्या अकलेचे गांवीं राहतात. आपणांला जरी ते खेड्यांच्या इतर लोकांप्रमाणे साधे, भोळे, भाबडे, आर्जवी, बावळट व कमअकली दिसले तरी त्यांच्या विशिष्ट कसबात तें त्याप्रमाणेच दगलबाजी करतात. आणि भाऊबंदी पेशाने (मत्सराने) त्याना पूर्ण पछाडले आहे. सारांश, फुकटखाउपणाचे सर्व अवगुण अडाण्यांत जसे शिरले तसे अखेर ते कुणब्यामध्येही उतरले. चौकोनी चिरा बनविण्यासारखी परिस्थिति जातिधर्माने व वतनी पद्धतीने गुदमरली म्हणून कुणबी व अडाणी ह्यांचे सर्वसामान्य ज्ञान अगदी शून्यावर यऊन बसले. तसेच अनेक शतकांच्या गुलामगिरीमळे दुसऱ्याच्या पागोट्यावर नजर ठेवण्याची खोड त्यांना लागली. आणि स्वाभिमान व प्रामाणिकपणा नष्ट झाला. शेतकऱ्यांचे दावे आपसांत तोडण्यासारखे लवाद गावमुनसफ खेड्यांत मिळत नाहींत ते ह्यामुळेच. हा त्यांचा दोष नव्हे. जातिधर्म व त्याचे अपत्य वतनपद्धति ह्यांचा हा दोष आहे. साध्याभोळ्या समाजापुरतेच का होईनात, पण तितके सुद्धा समाजिक व वैय्यक्तिक गुण असणारे सुधे लोक खेड्यांत आढळत नाहीत. तेंव्हा वतनपद्धतीची चाळणा करून गुणश्रेष्ठ लोकांना त्यांच्या गुणाप्रमाणे शक्य तितकी किफायत खेड्यांत होईल, अशी परिस्थिति निर्माण केल्याशिवाय खेडी ऊर्जितावस्थेस येणे अशक्य दिसतें.

 इतकं असूनही वतनपद्धति जर स्वस्त असती तर अजूनदेखील तिला ओव्या गायल्या असत्या. पण तशांतलाही प्रकार नाही. वतनदार पाटील-कुळकर्णी ह्यांचे काम सरकारला थोडेसें स्वस्त पडत असलें, तरी त्यांजकडून वेळच्या वेळी पाहिजे तसें काम बिलकुल होत नाही. म्हणून