पान:गांव-गाडा.pdf/237

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१६      गांव-गाडT.

लोकांना चटकन दिसते, पण त्यांची करामत-मेहनत मात्र पुरती दिसत नाही. खेड्यांत राहून त्यांच्या बरोबरीने आपली किफायत कशी होईल, ह्या विवंचनेत ते सदैव चूर असतात. खेड्यांत राहूनही गुणश्रेष्ठत्वानें मनुष्य भरभराटीस येईल. परंतु फार काळापासून खेड्यांत तळावर गळाठा राहत आला आहे. त्यांच्यांत सद्गुण यावेत कसे व कोठून ? गोकळ अष्टमीच्या सुमारास काही ठिकाणी उंच लटकावलेली दही-हंडी फोडण्याचा उत्सव होत असतो. तेथे चढून जाऊन दहीहंडी पहिल्याने फोडण्याचा मान मिळण्यासाठी पुष्कळ तरुण लोक धडपड करतात. ती अशीः-जो पुढे चढून जाऊ लागतो, त्याला खाली ओढून दुसरा वर जाऊ लागतो. याचप्रमाणे तिसरा चवथा पांचवा करतो, आणि अखेर सर्वांना खाली आणून चढून जाण्याचें ज्याला साधतें, तो सदरहू मान पटकावतो. हाच नमुना खेड्यांतले लोकांचा दिसून येतो. सर्व कारूनारूंमध्ये आपसांत भांडणे चालू असून हा त्याचे घर घ्यायाला पाहतो, व तो याचें घर घ्यायाला पाहतो. त्यांची भाऊबंदकी इतरांनाही भोवते. गांवांत तट पडून दुष्टावा सुरू होतो, आणि परगोटांतल्या लोकांच्या आगळिकी चालतात. ह्यांत त्यांचा सर्व काळ जाऊन ते आपापली कामें नीट व वक्तशीर करीत नाहीत. ज्यांचे काम न केले तर उत्पन्न बुडेल अशी भीति असते, तेवढ्यांचेच काम कारूनारू करतात, आणि गरीब बिनबोभाट्यांच्या असाम्यांना धाब्यावर बसवितात. अगोदरच कसब कमी, त्यांत चांगले कसबी शहरांत जातात, आणि राहिलेल्या गळंग्यांत आळस चुकारपणा ह्यांची भर पडल्यावर-खेड्याचा ज्ञानप्रवाह कसा जिवंत राहणार ? तो केव्हांच आटला आणि आमच्या पूर्वजांनी किती दिवसांपूर्वी तरी आम्हांस बजावून ठेवलें कीं यदीच्छसि मूर्खत्वं ग्रामे वस दिनत्रयं । नवीनस्यागमोनास्ति श्रुतपूर्वं विनश्यति ॥ तळ्यामध्ये खडा टाकला म्हणजे जरी पहिले वर्तुळ खड्याभोंवतीं होते, तरी त्याच्याभोंवतीं दुसरें, त्याच्या भोंवतीं तिसरे असें होतां होतां अखेर सर्व तळ्याभर वर्तुळे होतात. तीच स्थिति समाजाची आहे. समाजाच्या