पान:गांव-गाडा.pdf/239

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८      गांव-गाडा

मुदतशीर, चांगले व खरें काम करणारे लोक त्यांच्या जागी आले तर त्यांत एकंदर जनतेचा व सरकारचा निरंतरचा फायदा होईल. महारजागल्यांचा रयतेला आतां तादृश उपयोग नसतांना ते फुकट पोसावे लागतात; आणि त्यांनी जे काळीपांढरी राखण मामूलप्रमाणे करावयाचें तें सिंधी, कोल्हाटी वगैरेंकडून मोलाने करून घ्यावे लागते. कारूनारू जें काम करतात, तें रोकडीने केले असतां किती बचत होईल, ह्याबद्दल बलुतें-आलुतें ह्या प्रकरणामध्ये माहिती दिली आहेच.साधारणतः नवीन सनंगें करण्याला जितका खर्च येतो, तितक्या किंमतीचे मुख्य बलुतें कारूनारूंना डागडुजीप्रीत्यर्थ वर्षानुवर्ष द्यावे लागते. रोखीने हजामत केली तर दर डोकीला खेड्यांत सरासरीने सहा ते दहा आणे साल पडते; पण त्याच कामासाठी न्हाव्याला बलुतें रुपया सवा रुपयावर द्यावे लागते. एका गृहस्थाने आपले गड्याला सुतारकी लोहारकी शिकविली. त्याला ही कामें बलुत्यापेक्षा फार स्वस्त पडतात असे कळते. कारूनारू चालढकल व चाळवण्या करतात तेंखेरीज. रोखीने कोणी कुऱ्हाड करण्यास किंवा हजामत करण्यास किंवा आसूड सांधण्यास आला तर लोहार, सुतार, न्हावी, चांभार असाम्यांचे काम एकीकडे सारून रोकडीच्या गिऱ्हाइकाचे अगोदर करतील. कारूनारू आपल्या असाम्यांचे व गांवकीचें जें काम करतात त्याला 'गांवगुंडकी' किंवा 'बोभाटा' म्हणतात. त्यांचे आपापल्या कामांत किती लक्ष असते, व त्याची योग्यता ते किती समजतात, हे या शब्दांवरून सिद्ध होते. गांवगुंडकी म्हणजे फसवेगिरी आणि बोभाटा म्हणजे तक्रार. तेव्हां ज्या कामावर आपले पिडयानुपिढ्या पोट चालतें, तें मन लावून काळजीकाट्यानें न करतां तक्रार न होण्यापुरते करावयाचें अशी त्यांची पिढीजाद समजूत आहे. किरकोळ बाबतींत कोण तक्रार करतो ? त्यामुळे त्यांचे आयतेच साधते. आणखी असे आहे की, सर्व कारूनारू आपापल्या कामांत बहुधा तरबेज नसतात, आणि असाम्यांची पिढ्यानपिढ्या रखडपट्टी व उधळपट्टी चालते. कुग्रामवस्ती नको म्हणतात ती एवढ्यासाठीच. पैसा व श्रम ह्यांत कमी पडत नाही.