पान:गांव-गाडा.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २१५

स्वरूपांत आहेत, आणि इतर राष्ट्रांमध्ये चढाओढ व योग्य मोबदला ह्यांनी त्यांचा परिपोष केल्यामुळे त्यांना जोमदार व मोहक स्वरूप प्राप्त झालें आहे असे दिसून येईल.

 गांवगाडयाची भरती करण्यामध्ये असा प्रधान हेतु स्पष्ट दिसून येतो की, सर्व प्रकारच्या हुन्नरी लोकांना स्थावरामध्ये गुरफटून घेऊन, व गांवांत वंशपरंपरेचे उत्पन्न मिळण्याची त्यांची तरतूद करून देऊन ज्याचे त्याचे अखंड लक्ष आपापल्या कलेकडे लावावें म्हणजे गुणपोषण व गुणवृद्धि साधेल, आणि त्यांचा फायदा गांवाला मिळेल. वतनवृत्ति देऊन गांवगाड्याने सर्व हुन्नऱ्यांना निर्धास्त केलें खरें, पण आद्य हेतूप्रमाणे ते चालतात किंवा नाही ह्याची चाळणा करण्याचे सोडून दिले. ह्या हलगर्जीपणामुळे कामकऱ्याकडे लक्ष न पुरविणाऱ्या धन्याचे चाकर ज्याप्रमाणे काम न करता आपला रोज मात्र खरा करतात, तशी गांवगाड्याची अवस्था झाली, व खेड्यांतले हुन्नरी बहुतेक कवडीमोल झाले. आपल्या कसबांत ज्यांला डोके काढतां आलें त्यांच्या गुणांचे चीज गांवांत होईनासे होऊन ते गांव सोडून द्रव्यार्जनासाठी परगांवी जाऊ लागले. 'ज्या गांवीं भरेल पोटाचा दरा तो गांव बरा.' पूर्वीच्या अमदानीत आताप्रमाणे व्यापाराचा फैलाव नव्हता, तेव्हां चांगले कसबी बहुतेक राजधान्यांत लोटत. तेथे त्यांना राजाश्रय व महदाश्रय मिळे. ह्या वैश्ययुगांत राजाश्रयाची जागा व्यापाऱ्यांनी पटकावल्यामळे आतां खेड्यांतले चुणचुणीत व खणखणीत लोक शहरचा रस्ता सुधरतात, व ज्याच्या अंगी विशेष वकूब नाही, असेच लोक खेड्यांत राहून आपला प्रपंच करतात. वतनाच्या आमिषाने खेड्यांत कसबी लोक डांभून ठेवून कसब जतन करण्याचा व ते वाढविण्याचा जो आद्य हेतु तो कदीमपासूनच नष्ट झाल्या सारखा आहे. कर्तव्यो महदाश्रयः ह्या तत्त्वाचे अवलंबन करून पाटील कुळकर्णी ग्रामजोशी ह्यांनी शहरें पाहिली. सोनार, सुतार, लोहार, कासार, कुंभार, चांभार, महार, मांग वगैरे सर्वांनी हाच पंथ धरला. खेडे सोडलेल्या लोकांना जास्त पैसा मिळतो एवढे मात्र खेड्यांत राहिलेल्या