पान:गांव-गाडा.pdf/235

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४      गांव-गाडा.

आले आहेत. सुधारणा घडून येण्यास व्यक्तिवैचित्र्यास पूर्ण वाव पाहिजे. तो संप्रदाय-प्रधान वतनी पद्धतींत कसा मिळावा ? वडिलांनी जे हत्यार पांच बोटांनी धरलें तें जर कोणी तीन बोटांनी धरूं लागला तर बाकीचे त्याचा उपहास करतील, इतकेच नव्हे तर त्याला पाण्यांत पाहून वेळेला जातीबाहेर टाकतील, अशी वतनी कसब्यांची स्थिति आहे. मातकामाला वड्डरांची हत्यारे चांगली. असें सर्वजण पाहतात. परंतु इतर जातींचे लोक मातकाम परंपरेच्या निकामी हत्यारांनी करतात. सरण डोक्यावरच महारांनी वाहिले पाहिजे, अशी रूढि आहे. तेच दुसऱ्या जातींच्या गरीब मजुरांनी किंवा गाडीत घालून नेलें तर वाहतूक कमी पडेल. पण तसे करता येत नाही. दोन शिंवांशेजारच्या गांवांत आणि घराशेजारच्या घरांत भिन्न रूढि दिसते, आणि ती पिढ्यानपिढ्या पाळावी लागते. तिच्याविरुद्ध चालतां कामा नये. जातिधर्मानें हिंदी समाजाला रूढीचे गुलाम केलें व वतनपद्धतीने हा दोष जुलूम वाढविला. सर्कस व जादूगिरीचे उदाहरण घेऊ. गोपाळ, कोल्हाटी, ह्या कसरती जाती, वाघ अस्वलांचा खेळ करणारे दरवेशी, बैलांचा खेळ करणारे तिरमल, व माकडांचा खेळ करणारे कुंचीवाले, चित्तर वगैरे पाखरांचा खेळ करणारे फांसपारधी, नाग, धामीण, व नजरबंदीचा खेळ करणारे मदारी व मांगगारोडी ह्या आमच्यांतल्या सर्कस व जादूगिरी करणाऱ्या वतनदार जाती होत. ह्यांशिवाय मराठे, मुसलमान, चाबुकस्वारीचे काम करतात. विचार करा की, व्यक्तिवैचित्र्याला पूर्ण मुभा असती, तर युरोपियन सर्कसची सर्व कामें करण्यास ह्यांना कितीसे अधिक श्रम करावे लागले असते ? पण ती नसल्यामळे यरोपियन व एतद्देशीय सर्कसवाले खोऱ्यांनी पैसे ओढतात. आणि हे गांवोंगांव खळी मागत व चोरीत हिंडतात. आमच्या घरांतला पैसा परप्रांती किंवा परमुलखी खेचणासऱ्या कोणत्याही कला घ्या. त्या आमच्यांत नाहीत, असें नाही. त्या आमच्यांत आहेत. पण निःस्नेह वतनी पद्धतींत व कोंदट जातिधर्मात व्यक्तिगुणाचा परिपोष हजारों वर्षे न झाल्यामुळे आमच्यांत त्या अगदी निकृष्ट व जर्जर