पान:गांव-गाडा.pdf/232

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २११

तर, विभक्त कुटुंबांतून ब्राह्मणांपेक्षा इतर कारूंना पुष्कळ अधिक बलुतें मिळते. ब्राह्मणाच्या बलुत्यास किंवा दक्षिणेस टंगळमंगळ केली तर चालते, पण इतरांशी तसे करून चालत नाही. काम अडते किंवा नुकसान होते. हा फरक लक्षात ठेवला तर वाटण्या होण्याला जास्त उत्तेजन ब्राह्मणेतर कारूनारूंकडूनच मिळाले असले पाहिजे असें बोलणाराचें तोंड धरवणार नाही. कोणाच्या आपमतलबानें वांटण्यांना प्रोत्साहन मिळाले हा प्रश्न गौण आहे. शेत राखण्यासाठी कुपाटी केली व तिने शेत खाल्ले की काय असें विचारल्यास होच म्हणावे लागेल. एकत्र-कुटुंबव्यवस्था कधीही मोडूं नये म्हणून वतनदार गोळा केले, आणि त्यांच्याकडून स्वार्थामुळे ह्या आद्य हेतूचे पालन झाले नाही, हे वतनांच्या आणि वांटण्यांच्या घडामोडी व त्यांत वतनदारांनी दाखविलेली पक्षांधता ह्यांवरून सहज सिद्ध होण्यासारखे आहे. एकत्र कुटुंब-व्यवस्थेचें मूळ आमच्यांत व्यक्तिशः व समुच्चयानें हरएक बाबींत अगदी पाताळापर्यंत गेलें होते. एकत्र राहण्याने एकमेकांची एकमेकांना अतिशय माया लागते; व स्वकीय दुर्गुणी असला तरी त्याला सांवरून धरणे, त्याचे उणे पडून देणे हा आपला धर्म आहे असे लोक समजतात. वांटणी करण्याने कर्त्याचा नादानपणा दिसतो, व कुळाचें नांव जाते, असे सर्वजण मानतात. ह्या व अशाच इतर कारणांमुळे आमच्यांत फार वांटण्या झाल्या नाहीत. सबब कितीही रखडपट्टी झाली तरी एकवट रहावे असे अजून देखील आम्हांस वाटते, व डोळ्यावर कातडे ओढून आमची कुटुंबें एकत्र राहिली आहेत, ह्याचें श्रेय वतनपद्धतीकडे किंवा जातिभेदाकडे फारसें येत नाही.

 वतन संपादन करणारे गुणाढ्य असले पाहिजेत, ह्याबद्दल वाद नाही; आणि पुत्रवात्सल्याने त्यांना असेंही वाटले असावें की आपले सर्व गुण यावच्चंद्रदिवाकरौ आपल्या संततीत अबाधितपणाने उतरतील व वाढतील. पण त्यांची ही आशा सृष्टिनियमाविरुद्ध आहे असे मानवी अनुभव सांगतो. गुणोत्कर्षाला महत्त्वाकांक्षा लागते, आणि महत्त्वाकांक्षेला चढ़ाओढीचा लकडा व बक्षिसाचे आमिष लागते. निव्वळ विद्येसाठी विद्या