पान:गांव-गाडा.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०      गांव-गाडा.

नुकसान आहे ह्याचे धोरण त्यांना राहिले नाही. काहीं असो, एवढे मात्र खरें कीं, गांव-गाडा मुस्तकीम राखण्यासाठी आम्ही हा जो वतनदारांचा कोट रचला, आणि दुसऱ्याचा आंत रिघाव होऊ द्यावयाचा नाही असा बेत केला, तो सर्व ढासळला.

 गांवगाड्याला याप्रमाणे फटी पडत गेल्या आणि त्यांत निष्कारण कोंदाकोंदी व घुसडाघुसड पुष्कळ झाली. तसेच त्याला मूलभूत जी एकत्र कुटुंबव्यवस्था तिच्यांतही ओघानेच द्वैत शिरले. सर्व सपिंड आप्तांनी एकजुटीने उद्योग करावा; मिळालें तें एके ठिकाणी करावे आणि सर्वांनी सुखासमाधानाने एकत्र राहून त्याचा उपभोग घ्यावा; हा मूळचा कयास. परंत आमच्या वांटण्यांना निबंध नाही. पैपर्यंत जंगमाची वाटणी आणि वीतभर तुकड्यापर्यंत स्थावराची वाटणी होते. एकत्र कुटुंबव्यवस्थेमुळे कुटुंबांत रिकामटेकडे पुष्कळ झाले; आणि जात, धर्म, वतन ह्यांनी कामें परोपरीनें वांटून टाकल्यामुळे गांवांत बहुतेक अडाण्यांना पुरतेंसें काम राहिले नाही. त्यामुळे गृहकलह, कलागती व कपटी मसलती ह्यांना चांगला अवसर मिळाला. पूर्वी मुख्य वाटण्या वतनाच्या किंवा स्थावराच्या होत. त्या जितक्या जास्ती होतील तितकें कारूनारूंना अधिक आय मिळणार. गांवगाडा व कुटुंबव्यवस्था अखंड व अभेद्य चालविण्यासाठी जातिभेदाच्या अनुरोधानें वतनें अस्तित्वात आली. सर्वांचा ग्रह असा ठाम झाला की, वतनदारांचे हित-अनहित परस्परांशी व कुणब्यांशी जखडून टाकलें म्हणजे त्यांच्याकडून अयोग्य भेदाला मदत होणार नाही. परंतु जग इतकें सात्विक नाहीं, ब मनुष्यस्वभाव चंचल असतो, हे आम्ही विसरलो. 'जिकडे घुगऱ्या तिकडे उदय उदय.' तेव्हां ज्या पक्षाकडून जास्त नफा त्या पक्षाला बहुतेक वतनदार मिळत; आणि घर फोडीत. जे. डी. मेनप्रभृति युरोपियन ग्रंथकारांचा असा तर्क आहे की, जितक्या वाटण्या जास्ती तितकी श्राद्धे जास्ती झोडण्याला मिळतील, म्हणून घरभेद होण्यास मुख्य कारण ब्राह्मण झाले. किफायतीवरच जर हा कार्यकारणभाव ठेवावयाचा असेल