पान:गांव-गाडा.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१२      गांव-गाडा.

आणि गुणासाठीं गुण कमावणारा म्हणजे नांवासाठीं मरणारा अवतारी पुरुष विरळा. जात व वतन ह्यांचा आणि चढाओढीचा पुरता दावा आहे. आपली भाकर आपल्याला वंशपरंपरेनें मिळणार, ती कोणी काढून घेत नाहीं, अशी मनाची खात्री पटल्यावर आपला हात, आपलीं हत्यारें, आपला स्वभाव, सुधारण्याची खटपट व दगदग कोण करतो ? बरें, मेहनत करून कसब संपादिलें आणि सुधारणा केली, तरी मामूल वहिवाटीपेक्षां गुणांप्रमाणें जास्त बलुतें देऊन गुणांचें चीज कोण करणार ? अंधेर नगरी बेबंद राजा, टका शेर भाजा और टका शेर खाजा या दोहऱ्यांत वतनी पद्धतीच्या मेहनतान्याचें चांगलें वर्णन आहे. दुनियेभर निरखाच्या बाबतींत लोक वहिवाटीलाच धरून बसतात, आणि मामूलपेक्षां कोणी जास्त मागू लागला तर विचार न करितां ते रागावतात. युरोपियन बुटाला लोक ५|६ रुपये देण्यास कुरकुरत नाहींत. पण कातडें महाग झाल्यामुळे गोविंदा चांभारानें जोड्याबद्दल अनादि काळापासून चालत आलेल्या किंमतीपेक्षां चार दोन आणे जास्त मागितले कीं लोक लागले त्याची निर्भत्सना करण्याला,कां तर दोघेही वतनदार, ह्याचा परिणाम कसबी लोक आणि त्यांचे धनी या दोघांनाही म्हणजे सर्वदेशाला अनिष्ट झाला आहे. कलाकुसरी वाढेल तर माणसांच्या सुखांत भर पडेल. ती वाढविण्याला कसबी लोकांना लकडा व आमिष नसल्यामुळे आमचे ज्ञानाला रुणा लागला, आणि प्रत्येक पिढी असें गाणें गात राहिली कीं वडिलांचें हरएक बाबींत ज्ञान, सामर्थ्य, अधिकार कोणीकडे? आतांच्या दिवसांत तसे पुरुष राहिले आहेत कोठं ? पुराणुांतल्या कथा खऱ्या मानल्या तर अशी कबुली द्यावी लागेल कीं, आमचे कौशल्याला व शक्तीला एकसारखी उतरती कळा लागली, आणि ह्याचें कारण जातिधर्मात व वतन पद्धतीत मनुष्याचा आळशीपणा, आशाळूपणा, आपमतलबीपणा वगैरे हीन गुणांचा पुरता हिशेब धरला नाही, हें असावें. गतकुळी पड जमिनीची कोणी निगा करीत नसल्यानें ज्याप्रमाणें तिच्यांत एकादें झाड चुकून वाढतें, पण बाकी सर्व मूठ मूठ वीत वीत उंचीचीं झुडपें दिसतात; त्याप्रमाणे दैन्य व अपेष्टा पत्करून चढा-