पान:गांव-गाडा.pdf/230

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २०९

पुजारी किंवा उपाध्ये, म्हणजे वतनदार बनले आहेत. दर गांवीं असल्या वतनदारांचे व्यक्तिशः उत्पन्न साधारणतः ग्रामजोशाइतके तरी असते. ब्राह्मण ग्रामोपाध्यायांचे उत्पन्न व ब्राह्मणेतर भिक्षुकांचे उत्पन्न अशी वेगळाली काढली तर ब्राह्मणांपेक्षा इतर जातींचे भिक्षुक हिंदूंचा विशेषतः कुणब्यांचा पैसा कितीतरी पटीने ओढतात, अशी खात्री झाल्यावांचून राहाणार नाही. ब्राह्मणवृत्तीकडून वैश्यवृत्तीकडे वळल्यास असें दिसून येते की, दक्षिण प्रांतीं वतनदार शेट्ये, महाजन, नाईक वगैरेंच्या वृत्तीवर लिंगायत, मारवाडी, गुजराती ह्यांनी जे हल्ले चढविले ते त्यांना उलटवितां आले नाहीत, आणि आज रोहिल्यांनी सर्वांना मागे टाकले आहे. लोहार, सुतार, चांभार, या वतनदार कारूंची कामें घिसाडी, शिकलकर, बुरूड, कटारी, मोची वगैरे करतात, आणि जो पैसा वर लिहिलेल्या कारूंच्या घरांत जावयाचा तो ते ओढीत आहेत असें नजरेस येते. भिल्ल, कोळी, रामोशी, महार, मांग, नाईकवाडी, हवालदार वगैरे वतनदार हे पूर्वी गांवचे लष्कर व पोलीस होते. त्यांनी चोर, दंडेल, भटकणारे ह्यांच्यापासून गांवाचे रक्षण करावयाचे. ते त्यांच्याकडून न झाल्यामुळे अनेक परस्थ भिल्ल नाईक, तडवी ( मुसलमान भिल्ल ), ठोके, तोडागिरासिये, व भटकणाऱ्या चोर जाती गांवच्या वतनदार बनल्या; आणि जें उत्पन्न गांवकरी ग्रामरक्षकांना मिळावयाचें तें दुर्जनांना व बंडखोरांना मिळू लागले. इतकी उदाहरणे पुरी आहेत. अशी अवस्था होण्याचे मुख्य कारण हे असावे की, अडाणी वतनदारांना वाटले की, कोणताही बोजा पहिल्याने कुणब्यावर पडणार, व आपल्याला काही दिनचर्येची फिकीर नाही. दुसरे कारण असे दिसते की वतनदारांत जूट व तिने येणारी संघशक्ति राहिली नाही, त्यामुळे त्यांना एका मुसंडीने आपल्या व एकमेकांच्या वृत्तीवरचे मारे परतविता आले नाहीत. तिसरें कारण, काम येवो अथवा न येवो व ते कारू अगर नारू करो अथवा न करो त्यांच्या पोटापाण्याची निचिंती असल्यामुळे त्यांचें ज्ञान मंदावत गेलें; आणि वतनदारांच्या प्रकारांत अपरिमित भरती झाल्याच्या योगाने पहिल्याने कुणब्याचे व मागाहून आपले स्वतःचे किती