पान:गांव-गाडा.pdf/208

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १८७

काम सरकार करील तितकें थोडेच आहे. इलाखानिहाय शेतकीची कॉलेजें आहेत. त्यांत शिकून तयार झालेल्या लोकांना सरकार शेतीखात्यांत घेते, आणि त्यांच्याद्वारे कुणबिक्रीच्या ज्ञानाचा प्रसार करतें. मुंबई इलाख्याचे शेतकी कॉलेज पुणे येथे आहे. तेथेही शेतकीसंबंधानें प्रयोग व शोध चालू असून त्यांच्या माहितीचा प्रसार करण्याचे काम चालले आहे. सदर कॉलेजामध्ये थोड्या दिवसांत संपणाऱ्या अभ्यासक्रमाचे वर्ग आहेत, आणि देशी भाषांतून उसाची लागवड शिकविण्याचा वर्ग आहे. लोणी काळभर, जांभूळ (ठाणे), देवीहोसूर (धारवाड ), गोध्रा व मिरपुरखास (सिंध ) येथें देशी भाषांत कृषिविद्या शिकविणाऱ्या शाळा स्थापन झाल्यासारख्या आहेत. श्री० सरदार बिवलकर ह्यांनी अलीबागेस स्वतःच्या खर्चाने शेतकी शाळा चालविली आहे, आणि तिचा लोकांना पुष्कळ उपयोग होत आहे. शेतकी शाळा स्थापन करण्यासाठी चोपडे तालुक्याच्या लोकांनी वर्गणी जमविली आहे. सरकाराने अलीबाग, रत्नागिरी, धुळे, जळगांव, अहमदनगर, पुणे, मांजरी, नडियाद, सुरत, दोहद, धारवाड, गोकाक, गदग वगैरे ठिकाणी नमुन्याची शेतें स्थापिली आहेत. जनावरांच्या जोपासनेचा व त्यांची पैदास सुधारण्याचा बोध होण्यासाठी सरकारने दावणी घातल्या आहेत; त्यांत मुख्य गुजरातेतील नार्थकोट गोशाळा होय. सबंध इलाख्यांत शेतकी प्रयोगांची ठाणी वीस असून पोटठाणी एकोणीस आहेत. ह्या सर्व ठिकाणी जे शोध उपयुक्त ठरतात त्यांचे ज्ञान शेतकऱ्याला मिळावे म्हणून सरकार देशी भाषेत पुस्तकें पत्रके प्रसिद्ध करून गांवोगांव वाटीत आहे. त्यांमध्ये जमिनींची व बियांची निवड, कोणती नवीन पिकें कोठे काढता येतील, कोणती नवीन आउतें ( जसे वाफेचा नांगर ) इकडे उपयोगांत आणितां येतील, धान्य आणि जनावरांचे रोग व त्यांवरील उपाय, उत्तम खतें, उदीमांवरील कीड घालविण्याचे उपाय, दुभत्याच्या जनावरांची जोपासना, मलई काढण्याचे यंत्र वगैरेंबद्दल माहिती असते. ह्या सर्वांचे सप्रयोग ज्ञान देण्यासाठी ठिकठिकाणी प्रात्याक्षिके व प्रदर्शनही भरविण्यांत येतात.