पान:गांव-गाडा.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८      गांव-गाडा.

कातड्याच्या मोटा महाग होत आहेत, म्हणून पंप ऑईल एंजिन वगैरेकडून यांत्रिक शक्तीने पाणी काढण्याचे ज्ञान लोकांना देण्याची व पहारीने थोड्या खर्चात विहिरींना पाणी कसे लागेल ह्याची माहिती देण्याची खटपट अॅग्रिकल्चरल एंजिनीअर करतात. ह्यासंबंधानें व्यवहार्य योजना सादर करण्यासाठी सरकारने एक कमिटी नेमिली आहे. कुणब्याच्या दृष्टीने जमिनीच्या इतकेच महत्वाचे भांडवल गुरेढोरें होत; म्हणूनच तो जमिनीला आई आणि गुरांना लक्ष्मी म्हणतो. गेल्या तीस वर्षांत जनावरांची किंमत दुपटीवर गेली, आणि साठ रुपयांच्या खाली चांगला बैल मिळत नाही. जनावरांचे रोग बरे करण्यासाठी लोकल बोर्डे व म्युनिसिपालिट्या ह्यांनी ५० दवाखाने स्थापिले आहेत; आणि अद्यापि जरी ते तालुकानिहाय झाले नाहीत तरी त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व त्यांवरील डॉक्टर सवडीप्रमाणे गांवोगांव फिरतात. सरकारच्या सिव्हिल व्हेटर्नरी खात्याची त्यांवर देखरेख आहे. शेतकी खात्याप्रमाणे या खात्याचाही शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा; आणि आपली जनावरें चालढकलीने जायबंदी किंवा ठार होऊ देऊ नयेत. शेतीची व इतर जनावरे ह्यांची सुधारणा करण्याचे कामही ह्याच खात्याकडे सोपविले आहे. ठिकठिकाणी शेतकीसभा स्थापन करण्याला सरकार उत्तेजन देत आहे. त्या शेतकऱ्यांच्या हरप्रकारच्या अडचणी कशा दर करता येतील ह्याची वाटाघाट करतात. अशा सभा आपल्या इलाख्यांत सुमारे पन्नास आहेत. पुण्याची शेतकीसभा ‘शेत शेतकरी' नांवाचे कुणबिकीच्या माहितीने भरलेले मासिक पुस्तक प्रसिद्ध करते. नागपुरकडे 'किरसानी समाचार' नांवाचे असेच मासिक प्रसिद्ध होते. ही जी तोंडाशी गंगा आली आहे. तिचा लाभ सर्वांनी अवश्य करून घ्यावा; आणि ह्याखेरीज शेतीसंबंधाने लागेल ती माहिती जिल्ह्याचे अॅग्रिकल्चरल ओव्हरसियर ह्यांना विचारावी म्हणजे ते योग्य तो सल्ला देतील.

 सहानुभूतिविरहित अशा परप्रांतीय सावकारांच्या द्रव्यलोभाने आणि