पान:गांव-गाडा.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १८१

अदावती करण्याची बुद्धि धरणे हा होय. एकमेकांच्या शेतांत गुरे सोडणे, ती चोरून चारणे, सुड्या स्वतः किंवा इतरांकडून पेटविणे, गुरांना महारामांगाकडून विषप्रयोग करविणे, लुच्चेलफंग्यांना बगलेत मारून शेतांत चोऱ्या करणे किंवा करविणे, चोरलेल्या शेतमालाची ठेव ठेवणे किंवा तो स्वस्त्या भावाने खरेदी करणे, इत्यादि बळीराजाच्या पदवीला कमीपणा आणणारे पुष्कळ अवगुण कुणब्यांत संचरले आहेत. छोटेखानी गिरासिये, पाटीदार, कुणबी, शेतमाल चोरणाराला पाठीशी घालितात. हे पाहून एका डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिटेन्डेंट साहेबांना सखेदाश्चर्य वाटले, आणि ते हळहळून उद्गारले की, हातांत दिवटी घेऊन जर कुणबी विहिरीत उडी घालीत आहे तर त्याला इतरांनी तरी कसे वांचवावें ? मोलकऱ्यांमधील जे दोष येथवर वर्णन केले आहेत ते एकट्या कुणब्यांत आहेत आणि तदितर जातींचे मजुरांत नाहीत असें नाहीं. जातिस्वभावानुसार ते कमी किंवा अधिक-बहुधा अधिक-सर्व कामकऱ्यांत आहेत; आणि मजुरांत कुणब्यांची संख्या श्रेष्ठ असल्यामुळे 'हत्तीच्या पायांत सर्वांचे पाय' या न्यायाने ते जातिपरत्वे सांगत बसण्याची गरज नाही.

 तत्वतः कुणब्याच्या अवगुणांचे प्रमुख कारण सर्वांकडून त्याची होत असलेली कुतरओढ हे होय. तिच्यामुळे तो माशा पिल्याप्रमाणे गुंग होतो, आणि खऱ्याखोट्या देण्याची निवड करणे, व्यर्थ खर्च कमी करून बचतींतून आपली स्थिति सुधारणे इत्यादि काहीएक त्याला सुचेनासे होते. काळीत जे पिकतें त्याची लूट किंवा खैरात कमी होऊ लागली आणि तिचे उत्पन्न वाढले, तर कुणबी सर्व प्रकारे विशेषतः नैतिक व सांपत्तिकदृष्ट्या सुधरेल यात शंका नाही. पिनलकोड कमिशनरांनी असा अभिप्राय दिला की, ह्या देशांतील लोक आपण होऊन जुलमाचा प्रतीकार करणारे नाहीत, व त्यांचा टोलेखाऊपणा पाहून मन उदास होतें. ही स्थिति आज वाढली पण कमी झाली नसावी. तेव्हां महार, जागले व भिकार वगैरे खट्याळांचा व आडमुठ्यांचा बंदोबस्त करणे सर्वस्वी सरकारावर अवलंबून आहे. शेताचे सर्व उत्पन्न हाती लाग-