पान:गांव-गाडा.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२      गांव-गाडा.

ण्याला शेताचे राखण चांगले झाले पाहिजे. ही गोष्ट सरकारलाही फार इष्ट आहे, आणि म्हणून मुंबईसरकारच्या जमीनमहसुलाच्या कायद्याच्या ६५ व्या कलमान्वये त्यांनी अशी सवलत दिली आहे की, शेतकऱ्याने रहाण्यासाठी किंवा शेतीच्या उपयोगासाठी जर शेतांत इमला बांधला तर सरकार त्याजबद्दल जास्त पट्टी आकारणार नाही. अशा कामासाठी शेतांतले गाटेगोटे, माती शेतकऱ्याला मोफत मिळते. फलत्यवेक्षिता स्वर्ण दैन्यं सैवानवेक्षिता । कृषिः कृषिपुराणज्ञ इत्युवाच पराशरः !! रानांत राहिले ह्मणजे कोटकल्याण होतें ही गोष्ट कुणब्यालाही ऋषिकालापासून उमजतें. गांवांतून शेतांत आणि शेतांतून गांवांत ज्या माणसांच्या व जनावरांच्या येरझारा होतात त्या वांचतात, ताजे-तवानेपणी माणसांजनावरांना काम करावयाला सांपडते, व हेलपाट्यांचा वेळ वांचून कामही जास्त उठतें. माणसें जनावरें रानांत राहिल्याने गावांतली घाण नाहीशी होऊन सर्व खतमूत शेतांत मुरतें. गांवांत उकिरडा सांचविल्याने खताचा सर्व कस उकिरड्याचे खांचेंत जिरतो, व अगदी निकस खत शेतांत जातें, आणि ते चांगला चटका घेत नाही. म्हणून खताची वाहतूक अंगावर पडून ताज्या खतापेक्षा खतही जास्त लागते. 'राखील त्याचे शेत.' शेतांत राहिल्याने राखणाचा खर्च कमी येतो किंवा तो आजिबात वाचतो, आणि राखणही वेळच्यावेळी व सावधगिरीचे होते. परंतु रानांत राहणें निर्धोक केल्याशिवाय वरील फायदे कुणब्याच्या पदरांत पडावेत कसे ? गुन्हे करणारे लोक चोरून का होईना पण हत्यारे मिळवितात. त्यामुळे गांवांत सुद्धा त्यांचा प्रतीकार करून दरोडा परतविण्याची सोय नसते, मग रानांतली अवस्था काय विचारावी ? हिंस्र पशु व सर्प ह्यांपासूनही रानांत जिवाला धास्ती असते. ब्रिटिश हिंदुस्थानांत सन १९१२ साली २०६६ लोक हिंस्र पशूंनी मारले. आणि २१४६१ लोक सर्पदंशानें मेले. त्याचप्रमाणे सदर सालांत ९४८७३ गुरेढोरे रानटी पशूंनी मारली आणि १०३०१ ढोरें सर्पदंश होऊन मेली. गुराढोरांना एक नवीन विघ्न उद्भवलें