पान:गांव-गाडा.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १६३

पणाने त्यांनाही व्यापिलें. त्यामुळे त्यांना कुळांची भीड पडे, आणि पाण्यांत राहून माशांशी वैर करावें की नाही ह्याचा विचारच पडे. मागच्या राज्यांत चाललें तसें पुढेही चालेल, ह्या भिस्तीवर ते बसले, आणि समयानुरूप नवीन व्यापारी कसब ते शिकले नाहीत. दक्षिणी लोक परधारजिणी असल्यामुळे आणि मारवाड्यागुजरात्यांइतकी हिंमत, आंगमेहनत, व्यवहारदक्षता, बेमुरवत, काटकसर, व पोटांत शिरून आपला मतलब जाऊ न देण्याची शिताफी त्यांना नसल्यामुळे मारवाडी, गजराती व्यापाऱ्यांनी पथारी पसरल्याबरोबर खास दक्षिणी सावकारांना व दुकानदारांना आपला गाशा गुंडाळावा लागला. दाक्षिणात्यांची जी दुकानदारीची घडी मोडली ती मोडलीच; आणि आतां दक्षिणी सावकार व दुकानदार बियाला सुद्धा उरले नाहीत.

 खेड्यांतले उदमी व मोठ्या भांडवलाचे सराफ हे आतां बहुतेक ठिकाणी मारवाडी, गुजराती व कित्येक ठिकाणी लिंगायत आहेत. परदेशी व इतर जातींचे दुकानदारही क्वचित् आढळतात. बहुतेक दुकानदार मालाच्या खरेदी-विक्रीबरोबर व्याजबट्टाही करतात. त्यांच्या दुकानदारीचें व सावकारीचे वर्णन वर आलेच आहे. भावांत, वजनांत, हिशेबांत, सारांश जेथें गिऱ्हाईक गांठेल तेथे त्याला हे चेपतात. दुकानचे खाते फुगले म्हणजे हे व्याजमुद्दलासुद्धा रकमेचे कर्जरोखे किंवा गहाणरोखे करून घेतात, आणि गहाणाची बाकीही चढली म्हणजे कायमची किंवा नामधारी खरेदीखतें करून घेतात. स्थावराशिवाय लोकांत मान नाही. ह्यामुळे ह्यांची नजरही स्थावर संपादण्याकडे असते, आणि मण सहा पायल्या खावटीवारी किंवा चाळीस पन्नास रुपयांच्या खात्या अगर कर्जावारी वाण्यांनी मोठाल्या जमिनी, हवेल्या काबीज केल्याची उदाहरणे पुष्कळ सांपडतात. गहाणव्यवहाराची खरेदीखतें घेऊन हे जमिनीचा भाडेपट्टा तिऱ्हाइताच्या नांवाने करून घेतात. त्यामुळे कुळाला खरा व्यवहार शाबीद करण्याची पंचाईत पडते. हे जागेवर असतात, तेव्हां त्यांना कुळांना वेळच्या वेळी तगादा करण्याला किंवा रास होत अस-