पान:गांव-गाडा.pdf/183

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२      गांव-गाडा.

कुळे तितकें देत नाहीत, व तेही भांडणाचे तोंड काळे म्हणून माघार घेतात. दोन्ही वर्गांची संख्या इतकी अल्प आहे की ती जमेंत धरण्यासारखी नाही. कारण पुष्कळ दिवसांपासून दाक्षिणात्यांचा वैश्यवृत्तीकडे बहुतेक ओढा नाही म्हटले तरी चालेल. गेल्या हजार पांचशे वर्षांत विद्वान् व्हावें, राज्यकारभार हांकावा, जमेदार बनावें, स्थावर संपादावें, ह्या व ह्यांसारख्या उद्योगाची दक्षिणेत अतोनात चहादारी झाली; आणि तागडी-माप हाती धरावें व एकाचे दोन करावे, असल्या वाणिज्याला लोक तुच्छ मानूं लागले. ब्राह्मण किंवा क्षात्रधर्माना काय तो मान मिळू लागला; आणि वैश्यवृत्ति मानहीन झाली. हे दोन्ही रोजगार ताजे नव्हत. त्यांच्या उत्पन्नांचा झरा नसतो, पूर असतो. शेती, इनाम, वतनें, सालचाकरी वगैरेंचे उत्पन्न वर्षातून एकदा हातीं चढावयाचे. म्हणून इकडे नेहमी दाम दुष्काळ राहून, देणे घेणे व व्यापार परप्रांतियांचे हाती गेला; आणि गुजरात वगैरेच्या मानाने व्याजाचा दर नेहमीं जडीप राहिला. परंतु जिन्नसांच्या विशेषतः शेतमालाच्या व गांवहुन्नराच्या किंमती स्वस्त्या रहात गेल्या व जनता द्रव्यहीन राहिली, तरी वतनाचा मान ढळला नाही. अजूनसुद्धां खेड्यांत चार मंडळी जमली तर मानाची जागा, पानसुपारी अगोदर ब्राह्मणाला, साधूंना व वतनदारांना मिळते, मग ते दोन प्रहराला कां महाग असेनात; आणि त्यांच्या मागून शेटसावकारांना मान मिळतो. गांवपंचायतींत चांभार, महारांना बोलावलें नाही तर ते रुसतात. पण असला हक्क त्यांवर कर्ज असणाऱ्या शेटजींना सांगता येत नाही. असल्या सामाजिक कल्पनांमुळे आमच्या लोकांनी पूर्वीपासून व्यापारांत मन घातलें नाहीं, व नाण्याचे प्राबल्य ओळखिलें नाही. तरी पण सराफी करणारे काही ब्राह्मण नाईक होते; आणि सावकारी, दुकानदारी करणारी थोडी फार इतर जातींची घराणी होती. ह्या लोकांच्या पिढ्यानपिढ्या गांवांत झाल्यामुळे व त्यांना कमी अधीक वतनवाडी असल्यामुळे ते गांवच्या वतनदारांत मोडत, आणि कुळे शाबूत ठेवून त्यांना आपला धंदा करावा लागे. कुणब्याच्या भिडस्त-