पान:गांव-गाडा.pdf/185

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४      गांव-गाडा.

तांना खळ्यावर जाण्याला सांपडतें. ह्यांचे तोंड फार मोठे असते. ते इतकें की, वेळेवर हे रुपयाला रुपया देखील व्याज किंवा नफा मारतात. त्यामुळे कमी भांडवल असले तरी थोड्याच अवकाशांत त्यांची पथारी वाढून ते मोठ्या दुकानदारांत किंवा सराफांत मोडूं लागतात. दक्षिणेत कायमची घरेदारें करीपर्यंत मारवाडी गुजरात्यांनी मारवाङ-गुजरातेकडे डोळे ठेवून, इकडील लोकांच्या हितानहिताकडे लक्ष न देतां धंदा केला; आणि लोकांचा भोळेपणा, अदूरदर्शित्व व सरकारी कायदे ह्यांचा रेलचेल फायदा घेतला. ह्याचा सर्व दोष वाण्यांवरच लादतां येत नाही. कारण आमच्यासारखे घमेंडी, धौताल, व कूपमंडूक गिऱ्हाईक मिळाल्यावर कोणीही काटकसरी व व्यापारी नजरेचे लोक असते, तरी त्यांनी आपलाच मतलब साधला असता. आतां हे लोक दक्षिणेत स्थाईक झाल्यामुळे गिऱ्हाईक कायम ठेवण्याची व तें फारसें असंतुष्ट न करण्याची प्रवृत्ति त्यांच्यामध्ये निर्माण होणे साहजिक आहे. मोठाले सावकार गहाण जमिनी परत कुळांनाच लावतात, आणि खंड किंवा व्याज येतें तोंपर्यंत कुळांना कोर्टात ओढीत नाहीत. शेतकी कायद्याचे कलम ६४ व ६७ प्रमाणे कुळांना पावत्या दिल्या पाहिजेत, सालअखेर खातेंउतारा दिला पाहिजे, आणि खातें-वही देऊन तिच्यांत जमाखर्च टिपून दिला पाहिजे. असें न केले तर १०० रुपयेपर्यंत दंड होतो. ह्याप्रमाणे चालणारा हजारांत एक सांपडणे दुरापास्त होते, आणि हा कायदा पास होऊन तीन तपें झाली तरी 'मागील भरणा, पुष्कळ वसूल, पावती नाही. ' इत्यादि कुळांच्या पूर्वीच्याच तक्रारी अजून कायम आहेत. अंधेरांत देणे घेणे करणाऱ्या अब्रुदार कुळांची संख्या फारशी नाही. तेव्हां चावडीत चारचौघांसमक्ष देणे घेणे केले, आणि कुळ-पावतीसारखी वही करून तिजवर सरकारी वसुलाप्रमाणे गांवकामगारांकडून वसूल मांडून घेतला, व त्यावर सावकाराची सही घेतली, तर खेड्यांतील कुळे बुडणार नाहीत. पैसा किंवा माल उचलतांना कूळ नडलेले असते, हे कबूल केले तरी वसूल देतांना तें नडलेले नसते. मग पोंच मांडून