पान:गांव-गाडा.pdf/173

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२      गांव-गाडT.

अजागळपणा आहे. त्यांतले त्यांत कानगोष्ट अशी आहे की, यात्रेची वर्गणी गोळा करणारे इसम बहुधा गांवचे पुंड असतात. आपसांतलें खासगी वांकडे उगविण्याला आणि लोकांच्या पैशावर हौस पुरविण्याला यात्रा ही संधि चांगली असते. वर्गणी देण्याला आढेवेढे घेणे म्हणजे चारचौघांत मानखंडणा करून घेणे असे लोकांना वाटते. म्हणून ज्याला माणूसबळ व द्रव्यबळ कमी अशा लोकांना, विशेषतः बायाबापड्यांना, आपल्या ऐपतीबाहेर यात्रेची वर्गणी द्यावी लागते, आणि पुढाईत पुंड व त्यांच्या पुठ्यांतील मंडळी अजिबात कोरी राहते, किंवा अल्पस्वल्प वर्गणीवर सुटते. जमलेल्या वर्गणीत हे उजळ ठक मौज मारतात, आणि बचत तोंडात टाकतात. त्यामुळे हे गावकऱ्यांना चढ देतात, आणि नव्यानव्या यात्रा भरवितात. काढ हुडकून जुनें देवींचे किंवा खंडोबाबहिरोबाचे देऊळ, किंवा दरगा, अगर मशीद; अथवा एखाद्या बुवाची समाधि किंवा फकिराचे थडगें; किंवा बसीव आणून एखादा नवा साधु आणि भरीव यात्रा; व उकळ वर्गणी, हा ह्यांचा रोजगार. कोठे बसा कलभंडाशी झगडत, असा विचार करून भिडस्त गांवकरी भिण्याभावे किंवा भक्तिभावें यात्रा भरविण्याला होकार भरतात. ह्याचा परिणाम असा झाला आहे की, घाटावरील गांवांत यात्राच यात्रा बोकाळल्या आहेत.

 आठवडाबाजारांपेक्षां यात्रांमध्ये लांबलांबचे दुकानदार येतात, आणि ते टाकाऊ, भेसळीचा माल आणतात, व कसरीची वजनें, मापें वापरतात. आठवडाबाजारांतले दुकानदार व गिऱ्हाईक ह्यांची ओळख असल्यामुळे एका बाजाराला फसविल्यास दुसऱ्या बाजाराला ती गोष्ट गिऱ्हाईकाला दुकानदारांच्या आंगीं लावता येते. यात्रांमध्ये तशी स्थिति नसते. यात्रा करणाऱ्या दुकानदारांत हलकटांची संख्या अधिक असते. इमानेइतबारें सालभर मेहनत करणे ज्यांना आवडत नाही, असे लफंगे लोक काही तरी वेडावांकडा माल, मिठाई, कपडे, यात्रांत विकून आपली सालचंदी काढतात. दंडेल, ठोकेभाई व आसमंतांतील हक्कदार यात्रांत फार लोटतात. बिचारा कुणबी म्हणेल की, मी आपला माल