पान:गांव-गाडा.pdf/174

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १५३

यात्रांत विकावयाला काढीन तर सोय नसते. कां नसते ह्याची कारणे मागे आली आहेत. आठवडाबाजारांपेक्षां यात्रांत चोरटे, भामटे पुष्कळ जास्त येतात; आणि त्यांत बायकापोरांची गर्दी अधिक असल्यामुळे त्यांच्या हातचलाखीस वाव अधिक सांपडतो. उचलेगिरीतलें प्राथमिक शिक्षण मिळण्याला आडवळणी गांवांतल्या यात्रेसारखी शाळा क्वचितच आढळेल. पुष्कळ यात्रांतून अनेक तऱ्हेचा जुगारही चालू असतो. खऱ्याखोट्या भिकाऱ्यांची सर्व यात्रांत झिंबड असते, आणि त्यांचा उपसर्ग दुकानदारांना व गिऱ्हाइकांना फार लागतो. ते उघडपणे याचना व त्रागा आणि लपून छपून चोऱ्या करतात. लोक जिकडे तिकडे पांगलेले व बावरलेले असल्यामुळे चोरीचा पत्ता बहुधा लागत नाही. व्याधिग्रस्त, मुरळ्या, कोल्हाटणी, हरदासिणी यात्रांतून रोग व आचरटपणा यांचा प्रसार करतात. नाच, तमाशे चालू असल्यामुळे स्थानिक आधिकाऱ्यांना यात्रांतील अनिष्ट प्रकारांकडे लक्ष देण्यास फुरसत मिळत नाही ! गांव-कामगार व हलक्या दर्जाचे पोलीस ह्यांना यात्रा म्हणजे केवळ हक्काच्या करमणुकीची स्थाने होत, असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार नाहीं ! देवदर्शन, नवस फेडणे, करमणूक, आपापसांतल्या भेटी वगैरे कामांमुळे यात्रेकरूंची धांदलपट्टी चालते, आणि बहुतेक बोलून चालून मजेखातर आलेले असतात. वरील कारणांस्तव खेड्यांतले लोक यात्रांमधील सौद्यांत अतिशय ठकतात, व त्यांच्या चोऱ्याही पुष्कळ होतात. गांवोगांव आणि त्यांतही एकाच मित्तीला अनेक गांवीं यात्रा असल्यामुळे यात्रांचा नीट बंदोबस्त करण्यास पोलीसला अडचण पडते, व देखरेखीसाठी पुरेसे अंमलदार पाठविता येत नाही. वर वर्णन केलेल्या अनिष्ट प्रकारांसाठी यात्रा जितक्या कमी होतील, तितकें बरे असे वाटते. फार तर तालुक्याप्रत एकाद्या मध्यवर्ती मोठ्या गांवीं यात्रा भरवावी, आणि तेथें दुकानदार, मल्ल व खेळये जमावेत; म्हणजे विक्रीच्या मालावर भरपूर देखरेख राहील, दुकानदारांच्या लबाडीला आळा पडेल, स्वतंत्र यात्रा भरविण्याचा गांवचा खर्च वाचेल, आणि चढाओढीने गुणाची