पान:गांव-गाडा.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १३१

बायकापोरांनिशी दारू-तंबाखूचे व्यसन असते, अफू-गांजा सेवन करणारे आणि जुगार खेळणारे त्यांत पुष्कळ असतातं, आणि ह्यांपैकी एकही शोक पैशावांचून होत नाही. दर एक भुत्याला दीक्षा देतांना भोप्याला १०० रुपयांपर्यंत मिळकत होते. पोतराज करतांना भांग, गांजा, अफू, दारू वगैरे जितके म्हणून मादक पदार्थ असतील तितके पूजेला आणावे लागतात; व गुरुदक्षिणा, जेवणावळ मिळून सुमारे ५० रुयये खर्च येतो. पोतराजाचे धरित्रीपासून तो कलालापर्यंत १२ नमस्कार आहेत; आणि त्याला प्रत्येक कलालाचे दुकानी यथेच्छ दारू झोडण्याचा व दक्षिणा मागण्याचा हक्क आहे. एक वृद्ध पोतराज असे सांगत होता की, मुंबईस मनास वाटेल तितकी दारू मिळून पांच सात रुपयांखाली रोज जात नाही. कुंचेवाल्यांच्या लग्नांत मुलीच्या बापाला कमीत कमी पन्नास रुपये द्यावे लागतात. चित्रकथ्यांच्या लग्नाला दोनशे रुपयांचे वर खर्च येतो. फांसपारध्यांत १०० रुपयाचे खाली लग्न होत नाही, आणि १२५ रुपयेपर्यंत पंच दंड चोपतात. कोल्हाट्यांत लग्नाला ६०० - ७०० रुपये लागतात.

 चोरी, ठकबाजी करण्याच्या कामी गुन्हेगार-जातींना गोसावी, बैरागी, साधू , फकीर, वगैरेंचा वेष आतिशय उपयोगी पडतो. ह्याप्रमाणे नटून कोणी आला तर त्याच्या खाण्यापिण्याची चंगळ चालून त्याला घरें धुंडाळण्यास व वाटेल तेथे जाण्यास मज्जाव होत नाही. पुष्कळ गुन्हेगार जाती दुकानदारीचा आव घालून घरे हेरून ठेवतात व फोडतात. भामटे हे वारकरी, गोसावी, बैरागी, फकीर, यात्रेकरू वगैरेंची अनेक सोंगे आणून उचलगिरी करतात. बौरी (बावरी) जातीचे घरफोडे व दरोडेखोर अत्तरे व धातुपौष्टिक औषधे विकीत फिरतात. त्यांच्याबरोबर गाढवे, गाई, म्हशी, तट्टे असतात. समागमें बायकापोरें असल्यास ते गोसाव्याचा आणि सडेपणीं बैराग्याचा डौल घालतात. कांहीं खाकी साधू ( हे अंगाला भस्म चर्चितात, लंगोटी नेसतात आणि धुनी लावून बसतात. ) होतात. काहीजण कृत्रिम गंगाजलाच्या (पाण्यांत गोपी-