पान:गांव-गाडा.pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०      गांव-गाडा.

माहीत आहे. जो जो समाज रानवट तो तो मस्करी जास्त. तेव्हां भिकार जाती सांगतात की, मेहुणा आला म्हणजे तो जसा दोन चार गचांड्या देऊन लोळवितो, आणि खाण्यापिण्यापायी खर्चात घालतो, त्याप्रमाणे आषाढ श्रावण दोनचार गचांड्या देऊन खर्चाची तसदी लावतो. भिकार जाती गांवात भीक मागतात ती अशी की, गांवकऱ्यांना जातिपरत्वें व्यवसायपरत्वें आळवून गाणी ह्मणून,कोठे बायकोपोरांना खुलवून तर कोठे कट कट नको असें करून,हे लोक आपली झोळी भरतात.भिक्षा मागतांना जर कांहीं चीजवस्त हाताला लागली तर ते ती लांबवितात, आणि ज्या जातींचा चोरी हाच जात-धंदा त्या तर भीक मागतांना हटकून चोरी करावयाच्या. भिकाऱ्यांच्या पालांभोंवतीं झारेकरी व कनिष्ठ प्रतीचे जव्हेरी खड्यागुंड्यासाठी नेहमी घिरट्या घालीत असतात. त्यांच्या पर्यटनांत त्यांना कोठे कांहीं कोठे कांहीं सांपडते. आणि ते चोऱ्याही करतात. त्यांना असला माल उजागरा विकण्याची पंचाईत असते, आणि खरी किंमतही माहीत नसते. त्यामुळे सोनार, झारेकरी, वाणी, जुनापुराणा जर खडेगोटे घेणारे फेरीवाले इत्यादि लोक त्यांच्याजवळून हलक्या किंमतीने माल घेऊन चांगला लाट मारतात. कोणत्याही गांवीं मुक्काम घालण्यासाठी व तेथें तो तीन दिवस टिकविण्यासाठी सर्व भिकाऱ्यांना पाटील-कुळकर्णी व हलके पोलीस ह्यांची मनधरणी करावी लागते. भिकार म्हणजे ह्या लोकांच्या बिनबोभाट उत्पन्नाची एक बाजू आहे. त्यामुळे कुणब्यांना कितीही त्रास झाला व वर्दळ लागली तरी गप्प बसावे लागते. भिकार जातींची किफायत किती आहे ह्याची कल्पना पुढील गोष्टींवरून करता येईल. पुण्याकडील खेड तालुक्यांतले ठोकेजोशी सावकारी करतात. भटकणाऱ्या भिकाऱ्यांमध्ये

-----

 १ पारनेर तालुक्यांत पांचसहा वर्षांपूर्वी काही गोपाळांवर खुनाची तोहमत होती तेव्हां त्यांनी सुमारे हजार रुपये खर्च केला व चांगले चांगले सावकार त्यांना जामीन राहिले. १९१० साली पारनेरच्या मामलेदारांनी शेतचोरीबद्दल सात मांगगारोड्यांना प्रत्येकी शंभर रुपये दंड केला. त्यांतले ६०० रुपये तात्काळ आले आणि बाकी आठचार दिवसांत आले. साक्षीपुराव्याचा व वकिलांचा खर्च वेगळा