पान:गांव-गाडा.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२      गांव-गाडा.

चंदन कालविलें म्हणजे तें भागीरथीच्या पापयासारखें दिसतें. ) कावडी घेऊन हिंडतात. खोटीं नाणीं पाडणारे व चालविणारे मारवाड अथवा गुजरात बौरी भाटाच्या, गिरी गोसाव्याच्या किंवा कबीरपंथी फकिराच्या थाटानें फेरीला निघतात, आणि बाण्या-दोहरे न अडखळतां म्हणतात. फकिराची ऐट आणून विजापुराकडील छप्परबंद नांवाचे मुसलमान लोक खोटीं नाणों पाडतात व चालवितात. औधीये लोक बैरागी किंवा ब्राह्मण यात्रेकरू बनतात आणि चोऱ्या करतात. उजळे मीने (मीयाने) लोक संजोगी साधूंची अक्कड लावून भगवा फेटा घालतात, किंवा कधीं कधीं ज्योतिषी बनतात आणि चोऱ्या घरफोड्या करतात.

 नाशिक, पंढरपूर, तुळजापूर, वगैरे क्षेत्रांच्या रस्त्यांवरील गांवांना सर्व पंथांच्या व धर्मीच्या खऱ्या-खोट्या सांधूंची बेहद्द तोषीस लागते. नवीन क्षेत्रं, नवीन साधू व नवीन पंथ निर्माण करण्यांत हिंदूंची बरोबरी करणारा एकही धर्म सबंध पृथ्वीत नाहीं. ‘ जितने कंकर उतने शंकर ' ' कवडीस कवी आणि गोवरीस गोसावी.' प्रवाससौकर्य आणि काठीला सोनें उघडें बांधून जाण्याइतकी शांतता असल्यावर क्षेत्रांच्या वृद्धीला आणि यात्रेकरूंच्या पायपिटीला ताळतंत्र कोठलें राहणार ? ह्यामुळे सध्यां गांवोगांव नेहमीं विकल, भिकारी, व साधू वस्तीला आलेले दृष्टीस पडतात. आंधळ्यापांगळ्यांची माळ बरीच मोठी असते, आणि त्यांना किफायतही पुष्कळ होते. आंधळे पांगळे अत्यंत सांसारिक व व्यसनी असून बहुधा दोन पैसे बाळगून असतात, कारण त्यांना दान करण्याची धर्मप्रवृत्तींपेक्षां, फॅशन ऊर्फ नवप्रिय चाल अलीकडे झपाट्यानें वाढत आहे. बायकापोरांचा संसार तर ते थाटानें करतातच; पण कैफही सडकून करतात. निरुद्योगी आंधळ्यापांगळ्यांच्या माळेचा उपसर्ग खेड्यांना हमेषा लागतो. त्यांचप्रमाणें वारकऱ्यांच्या दिंड्या–पालख्यांच्या वाटेवरल्या गांवांना त्याप्रीत्यर्थ नेहमी बराच खर्च येतो.

-----

१ एका गांजाच्या खटल्यांत एका वारकरी आंधळ्याला २० रुपये दंड मुनावतांच पांच सात मिनिटांत त्याच्या बायकोनें बिऱ्हाडावरून पैसे आणून भरले.