पान:गांव-गाडा.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १२७

मन आकर्षण करतात. अशा रीतीने बिचारा रानचा गडी सुंभ होतो आणि भिकाराला उघड्या डोळ्यांनी शेत लुटू देतो. हा झाला उघड उघड रोजगार. ह्याखेरीज जमेल तेथें रात्रीतून पीक काढून नेण्याची अगर दावण बसविण्याची दहशत घालून खळे मागण्याला फिरतें भिकार कमी करीत नाही. 'कुनबी सरीखा दाता नहीं । पन मारे बिगर देता नहीं ॥' हा मंत्र कुणब्याला लुबाडणाऱ्या सर्व जातींच्या बायकापोरांनिशीं तोंडपाठ आहे; आणि त्याप्रमाणे त्याचा अंमलही जारी आहे. ह्याप्रमाणे

-----

 १नंदी ढवळा महादेव झाला ईश्वर स्वारी। बीं भरून पेरले एका भूमिकेच्या उदरी।। गण्या वर्षला मेघराजा पिकल्या घुंबरी । पांचा कणसांसाठी महादेव करून गेला चोरी ।। फिरून घेतली पांच कणसें मेंडे उडविले चारी। महादेवाचा गळा बांधिला एका वेळावरी ॥ सोड बळीराया तुझें भाग्य आहे थोरी । सोडून दिले बळीने महादेव गेला गिरजाजवळी ।। काय सांगू गिरजाराणी भगत मारू केला । अमृता शिपाई घोडा साजवंत केला ॥ फिरविलें मुंडासें हातभर बिलवला तुरा । धावू घातली वावरे बळी सांपडला बरा ॥ आव रे कुणबी हुरडा लेव रे बारीक । धांवत गेला बळी हुरडा मोडी निर्वाणीचा ॥ आपण खातो गिरजा देतो महादेव मौज पाहतो । गेला सारा दोरा दिवाणे केलें हवालदारू । अवकळी बळीराज संगे दिला हावलदारू ।। लाललाल घटी बुवाची सवारंग पट्टी । मुलखीचे दरबारी बुवाजी सांगत असे गोष्टी॥ मुलखींचा आला बुवाजी धराया नी नेला । आंध्रव गंध्रव राजा स्वर्गीचा झाला ।। अंकळी टंकळी राजा निर्वाणीची ढाळी । असा पवाडा गाते तुझ्या धर्माची साळी ॥

 देशी गांवांत खळी मगांतांना भिकार जाती कुणब्याला बहुधा वरील पोवाडा गातात, मानवाचें सत्त्व पाहण्यासाठी देव वाटेल ते रूप धारण करतो, व दान देणाराला स्वर्ग प्राप्त होतो; ही भिक्षेकऱ्यांच्या पथ्यावरची कल्पना ह्यांत मुख्य असून, गांव-मुकादमानीत सारावसुलीमध्ये कुणब्याला होत असलेल्या त्रासाचे वर्णन आहे.