पान:गांव-गाडा.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६      गांव-गाडा.

पापी कुणबी आंगाला झटून अब्रू घेऊ पाहतो, असाही आळ कित्येक जणी घालतात. अशा स्थितींत 'भीक नको कुत्रें आटोप' असें कुणब्याला होते. प्रसंग पाहून महार, मांग, भिल्ल, ह्यांच्या बायकाही शेतमाल चोरतांना असल्या युक्त्या अंगिकारितात. फिरस्त्यांच्या कांहीं जातींत पुरुष व बायका मिळून शेत मागावयास जातात, आणि कांहीं जातींमध्ये बायका-पुरुष वेगवेगळाले जातात. हे लोक शेतांत निरनिराळ्या वाटांनी एकदम घुसतात, आणि कणसें काढण्याचा तडाका लावतात. कुणबी अरे अरे करतो, इकडे एकाला किंवा एकीला घालवावयाला जातो, तों तिकडे दहापंधरा इसमांची कणसें खुडण्याची एकच गर्दी उसळते. त्याने आरडाओरड केली, म्हणजे सर्वजण त्याला वेढतात आणि बोलबोलून गोंधळून टाकतात. मांग-गारोडी, कैकाडी, चित्रकथी, फांसपारधी, इत्यादि चोरट्या जाती शेत उकळण्यांत फार बाक्या आहेत. तळाचा नाईक भले थोरले मुंडासें चढवून बरोबर मैना घेतो, आणि 'पाटील रामराम पाटील रामराम' करीत शेतकऱ्याच्या पुढे जातो. इतर बायका पुरुष चोहों बाजूनी शेतांत घुसून कणसें तोडूं लागतात. कुणबी शेतावर नजर टाकतो तों जिकडे तिकडे कणसें खुडण्याची एकच झिंबड त्याला दिसून येते, व तो रागें भरूं लागतो. परंतु 'मोठा दैवाचा बळीराजा धर्माचा वांटा दे' इत्यादि गुळचट भाषणे करून नाईक त्याला हरभऱ्याचे झाडावर चढवितो व खुलवितो; आणि मैना कोठे गळ्यांत हात घालून, तर कोठे दाढीला हात लावून पोवाडे, इष्किबाज गाणी व उखाणे म्हणून त्याची थट्टा सुरू करते. तेव्हां अर्थात् त्याची नजर शेतावरून गरंगळते. एवढ्या अवधीत सर्व टोळी दोन तीन पायल्यांना झोका देते: खेरीज नाईकाची भिक्षा व मैनेची ओवाळणी. कोल्हाटी-हरदासांच्या नायकिणी आडपडदा न ठेवतां थट्टा करतात, हे सांगणे नकोच. कंजारणीही टाळ्या पिटून अचकट विचकट उखाणे म्हणत म्हणत कुणब्याला अंगस्पर्श करतात. मांगगारोडी, फांसपारधी ह्यांच्या बायका आणि साधारपणे बहुतेक भिकार जातींच्या बायका शेत मागतांना करवेल तितकें कुणब्याचे