पान:गांव-गाडा.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १२८

दिवसा पेंढीदाणा गोळा करतांना रात्री कोणत्या शेतांत बिनबोभाट गरें चारता येतील, कोणत्या शेतातील पीक, लांकूड, ढोरे, मेंढ्या, कोंबड्या, नाडे उपटतां येतील हेही हे लोक टेहाळून ठेवतात, आणि त्याप्रमाणे रात्री काम उरकतात.

 झुंझरका राखणदाराला डोळा लागला म्हणजे चोरपावलाने शेतांत शिरून आपल्या गोण्यांत किंवा घोंगड्यांत धान्य अगर कणसें भरण्याची अनेक भिकार जातींची वहिवाट आहे. काही मध्यरात्रीला अगर पहिल्या रात्रीला म्हणजे कुणबी जेवणखाण करतो अशा वेळेला डल्ला मारतात. हे लोक चोरलेली कणसें लागलीच कुटतात व खातात, किंवा त्यांचे धान्य दुसऱ्या धान्यांत कालवतात; म्हणजे चोरी ओळखण्याची व अंगी लावण्याची अडचण पडते. गुराखी दोनप्रहरी लवंडला असतां ढोरवाड्यांतून किंवा मैदानांत चरणाऱ्या कळपांतून वंजारी, मांगगारोडी, चित्रकथी, पारधी व इतर ढोरे पाळणाऱ्या भटकणाऱ्या भिकार जातींचे लोक आणि स्थाईक चोरटे गुरेढोरें लांबवितात. ते आपली गुरे गांवच्या गुरांबरोबर करण्याला सोडतात, आणि आपल्या गुरांबरोबर गांवची गुरेही हांकून नेतात. रात्री रस्त्याने गाडी चालली असतां तिचा एक बैल सोडून एकजण जूंवाला खांदा देतो, आणि सोडलेला बैल आपल्या साथीदाराच्या हवाली करतो. व तो लांब गेला म्हणजे आपण जूं सोडून पसार होतो. गाडी वांकडी तिकडी चालून गाडीवाला जागा होतो, तोपर्यंत सोडलेला बैल कोठल्या कोठे नेलेला असतो. मेंढक्याने पाठ फिरविली की मांगगारोडी, कैकाडी, कळपांतून एकीकडे चरत असलेल्या बकऱ्याची किंवा मेंढराची हिसक्यासरशी मुंडी मुरगळतात, व त्याला झुडपांत किवा खांचेंत टाकून झटकतात; आणि मेंढक्या दृष्टीआड झाला म्हणजे तेथे परत येऊन तें बकरें अगर मेंढरूं घेऊन जातात. रात्रीच्या वेळी वंजारी मेंढ्यांच्या कळपांत शिरून यांना बिचकावतात, आणि त्या धांदलींत मेंढरे घेऊन पसार होतात. मेंढक्या आडवा झाला तर ते त्याला चोपतात. बेरड लोक हातांत वाघनख घालून वाघाचा किंवा लांडग्याचा आविर्भाव आणून कळपांत शिर-