पान:गांव-गाडा.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      १०९

शिवळटी, रुमणे, दांताळे, जू, वडवान, मोटेचे सुळे, डुबे, मोगरी, फावडी, मेखा, दांडे, खुंटे, मुठी, लोहार व सोनार ह्यांच्या ऐरणीचे खोड, घन व हातोड्यांचे दांडे; चांभाराची फरांडी ( ज्यावर कातडे कापतात तें चापट लांकूड ), कुंभाराच्या चाकाचे तळ, आंबा घडण्याचे फळे; परटाची मोगरी; व सर्व आलुत्याबलुत्यांच्या मेखा, दांडे वगैरे. नवीन नांगर, पाभर, तिफण किंवा गाडा भरणे झाल्यास तो मजुरी घेतो. नांगर दोन तीन व पाभर तिफण पांच सहा वर्षे टिकतात. बाकीच्या आऊतकाठीची डागडुजी नेहमी करावी लागते. नवीन मोघड करतात त्या सालीं सुताराला चार शेर व एरवीं आच्छेर तें तीन शेर पर्यंत बीं कुणबी देतात, आणि रासमाथ्याला शेकडा २ प्रमाणे बलुतें देतात. सुतार कामासाठी कुणबी व इतर लोक जें लाकूड आणतात त्याच्या ढलप्या सुतारच ठेवतो आणि विकतो. जळण महाग झाल्यामुळे त्यांत त्याला चांगला नफा मिळतो.

 लोहारकामासाठी लोहाराला लोखंड व सरपण, कोळसे, गोवऱ्या, ही पदरची पुरवावी लागतात; आणि त्याच्या हाताखालीं गडी द्यावा लागतो. लोहारकाम बहुतेक त्याच्या भट्टीवर चालते. तो बलुत्यामध्ये खाली

-----

 १ साधारणपणे लाकूड देऊन सुतारकामांची रोख मजुरी पडते ती अशी-

 किंमत   सनंग   किती वर्षे टिकतें.
 रु. १   नांगर   ३,४
    वखर   
    पाभर   
 σ ८   कोळपें मोठे   
 σ ६   कोळपें लहान   
 σ ४   आऊताची जूसर   

बलुतदार सुतार दोन बैलांच्या आऊतामागे दरसाल सुमारे ३ σ ८ रुपयांचे नुसतें धान्य घेतो, याशिवाय वरकड किफायत, असे कुणबी सांगतात.