पान:गांव-गाडा.pdf/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८      गांव-गाडा.


महार जागल्यांचे ऐनजिनसी हक्क व बलुतें बंद झाले पाहिजे व त्यांना रोख मुशाहिरा देण्याची तजवीज झाली पाहिजे. त्यांचे वतन इनाम खालसा करून त्यांतून त्यांचा पगार भागत नसल्यास लोकांनी तत्प्रीत्यर्थ अल्पसा कर देण्याचे कबूल करावें. सबंध महारवाडा, मांगवण, कोळवण, रामोसवाडा, भिलाटी अंधेरांत पोसण्यापेक्षां नियमित संख्येचा उघड्या डोळ्यांनी व मोकळ्या हातांनी पगार देणे खात्रीने फायदेशीर होईल. निमगांव तालुका शेवगांव जि. नगर येथे महारांचा व गांवचा बेबनाव झाल्यावर गांवानें पांच रुपये दरमहावर एक कोळी ठेऊन त्याजकडून गांवकीचे काम घेतलें, तेव्हां काम अति उत्तम होऊन एकंदर गांवची पुष्कळ बचत झाली. ह्या अनुभवाची शीक इतरांनी घेतल्यास परिणामी उभयपक्षी कल्याण होईल.

 टांकसाळ झाल्यापासून सोनाराची पोतदारी सुटली. तो आतां बलुत्यांत कुणब्यांचे व आलुत्या-बलुत्यांचे रुप्याचे किरकोळ व ठोसर डाग घडतो. उदाहरणार्थ-टांक, कान टोचणे, आंगठ्या, कडी, गोठ इ. कलाकुसरीच्या व श्रमाच्या दागिन्यांबद्दल तो मजुरी घेतो. काही ठिकाणी पाटीलकुळकर्णी त्याला गाड्या बैल धरणे, लोक बोलावणे वगैरे जागलिकीची कामें सांगतात; तेव्हां तो सरकारने नेमलेल्या जागल्याप्रमाणे बलुतें वसूल करतो. एरवीं सोनाराला महार जागल्यांच्या दहावा हिस्सा बलुतें मिळते. याखेरीज शेतांत असेल त्या उदिमाची जातां येतां वाणगी, सणावाराला वाढणे किंवा शिधा, दिवाळीची ओवाळणी, पोस्त वगैरे सर्व कारूनारूंना मिळते; हे येथे एकदां सांगून ठेविलें म्हणजे दर कारूनारूच्या हकीकतीत सदरहु मिळकतीचा पुनरुच्चार करण्याचे प्रयोजन नाही.

 सुतारकामासाठी कुणब्यांना सुताराला लाकूड पुरवावे लागते, आणि त्याच्या हाताखाली गडी द्यावा लागतो. बहुतेक काम तो आपल्या घरी 'सुतार पिढ्या' वर किंवा 'नेटा' वर करतो. मोटेचे वडवान बसविणे वगैरे सारखें काम तो जरूरीप्रमाणे शेतांत जाऊन करतो. मजूरी न घेतां बलुत्यांत खाली लिहिलेली कुणबिकीची व कारभावांची कामें तो करतो. नांगर, हाळस, मोघड, फराट, वावडी, पाभर, कुळव, कोळपें,