पान:गांव-गाडा.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      १०५


किंवा ' हातधुलाई' म्हणतात, व हिरव्या सबंध कातड्याला "आघोड ' म्हणतात. आघोड परत आले म्हणजे लोक तें ढोराला अगर चांभाराला देऊन त्याचे जोडे, चाबूक, नाडे वगैरे करून घेत. आतां महार सर्रास सर्वांजवळून दोन शेर तें तीन चार पायली पर्यंत घाटा घेतात, पण दांडामुडपा करून आघोड आपणच उपटून बसतात. कोठे कोठे देशमुख, पाटील ह्यांना मात्र ते अघोड देतात असें ऐकतों. महर्गतेवरील रिपोर्टांत मि० दत्त ह्यांनी असे सिद्ध केले आहे की, १८९० ते १९१२ पर्यंत कातड्याची किंमत सरासरी दुपटीने वाढली आहे. हाडका कातड्यांना जशी किंमत चढली तसें महारांनी आखडतें घेतलें, व ते चांगले पैसे करूं लागले. अशी लौकिक समजूत आहे की, महारांजवळ बेमालूम विषप्रयोगाची औषधे व त्यांचा उतारा आहे; त्यामुळे त्यांनी जनावरांना केलेले विषप्रयोग सिद्ध करता येत नाहीत, आणि विष घातलेल्या जनावरांची माती त्यांनी खाल्ली तरी ती त्यांना बाधत नाही.

 सन १८३९ चा आक्ट २० अन्वयें सरकारने सर्वांना बाजार उकळण्याची मनाई केली आहे. परंतु पाडेवार महार, जागले व ज्यांची कामें सरकारनें वजा केली आहेत, असे हवालदार, नाईकवाडी, पोतदार ह्यांचे वंशज, आणि फकीर, गोसावी, बैरागी व अठरापगड ब्राह्मणेतर भिक्षुक रोजच्या व आठवड्याच्या बाजारांत उकाळा, फसकी, शेव इ. उकळतात. गवत, कडबा, सरपण, भाजीपाला, फळफळावळ, तेल, धान्य, पानसुपारी, तंबाखू , विड्या, इत्यादि काहीही बाजारांत आले की त्यावर ही टोळधाड पडलीच. दुकानदार आळम टाळम करूं लागला तर हे लोक मालांत हात घालून तो उपसतात, आणि वेळेवर मारामारीही करतात. पाटील व हलके पोलीस ह्यांचा ओढा महारजागल्यांकडे असल्यामुळे तालुक्याच्या ठाण्यांत देखील त्यांची ही लूटमार बेलाशक चालते; आणि असा

-----

१ पारनेरच्या आठवडे बाजारांत १९१७ चे फेब्रुआरी महिन्यांत रायतळ्याच्या एका कुणब्याने उसाची गाडी आणली, त्यांतले कांहीं ऊस पाऊण

(पृष्ठ १०६ पहा.)