पान:गांव-गाडा.pdf/125

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४      गांव-गाडा.


त्यामुळे हरघडी उष्ट्याचें नांव पुढे करून ते अन्न मागत सुटतात. दिवाळीला सर्व कारूनारू ओवाळणी मागतात. त्यावेळी त्यांना चोळीचे खण व पैसे द्यावे लागतात. लग्नामध्ये वराचा शेला महाराला मिळतो. ग्रहणाचे वेळी महार मांग धान्य, वस्त्र व पैसे मागतात. अमावास्या व मरेआईची पूजा मांगाकडे आहे. कोठे कोठे महारही हे काम करतात. मांगांना दर अमावास्येच्या दिवशी 'सतका मतका ' (उडिदांची डाळ, राळे अगर इतर धान्य, पीठ, मीठ, मिरच्या, तेल इत्यादि जिनसा) घरोघर मिळतो. आषाढांत व विशेषतः पटकी सुरू झाली म्हणजे हे मरेआईचे पुजारी दर मंगळवार शुक्रवार दौंडी देऊन घरोघरचा नैवेद्य मागवितात. नैवेद्याबरोबर नारळ, पैसा सुपारी, बांगड्या, खण वगैरे असतात. बहुतेक ठिकाणी मरेआईसाठी सवा मण किंवा अधिक भाताचा बळी काढतात, मांगिणीला हिरवें लुगडे चोळी बांगड्या देतात, आणि मिरवणुकीचे वेळी खूप नारळ फोडतात व लिंबे कापतात. मरेआईचे उत्पन्न किती होत असावें ह्याचा खालील गोष्टीवरून अंदाज होईल. कर्जत जिल्हा नगर येथे सन १९१२ साली गांवकऱ्यांनी महारांकडून मरेआईची पूजा करविली, आणि सुमारे २५० रु. वर्गणी करून बळी काढला. मांगांनी एका मुसलमानाला शंभर सवाशें रुपये देऊन त्याच्या बायकोच्या अंगांत मरेआई आणविली, आणि तिजकडून असें वदविलें की, मला महाराची पूजा पावली नाही, मांगांची पाहिजे ! ख्रिस्ती झालेले महार मांग सुद्धा तेवढ्या पुरते मरेआईचे भगत बनून आपली तुंबडी भरून घेतात!! प्रेताचे सरण वाहण्याबद्दल वतनदारांकडून महार प्रेतावरील वस्त्र, विसाव्याचे जागेचा पैसा व दिवसाचे जेवण घेतात: आणि इतरांपासून पांच आणे ते सवारुपया-प्लेग-पटकीचे दिवसांत दोन रुपयेपर्यंत-मजुरी घेतात. बलुत्यांतच पूर्वी महार जनावरें ओढून नेत आणि त्यांची माती हाडकें घेऊन मिरासदारांना कातडे आणून देत. उपऱ्या जवळून ते दोन ते सहा पायली धान्य अगर आठ आणे तें रुपया घेऊन त्यांनाही कातडे परत देत; अशी स्थिति असावी. जनावर ओढण्यासाठी जे धान्य महारांना देतात त्याला 'घाटा'