पान:गांव-गाडा.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बलुतें-आलुतें.
----------

 पाटील-कुळकर्ण्यांपेक्षा हलक्या दर्जाचे गांवनोकर म्हटले म्हणजे महार जागले होत. त्यांना प्रांतपरत्वे निरनिराळ्या संज्ञा आहेत. त्यांची यादी 'गांव-मुकादमानी'त दिलीच आहे. सरकार उपयोगी वतनदार गांवनोकरांमध्ये आतां बलुतदार काय ते महार जागलेच राहिले आहेत, आणि रयत उपयोगी गांवनोकरांपेक्षा त्यांना बलुतें फार मिळते. त्यांची कांही कामें रयत उपयोगी मानतात, म्हणून महार-जागल्यांना सरकार-रयत-उपयोगी गांवनोकर असेंही म्हणतात. पाटील-कुळकर्ण्यांप्रमाणे त्यांची तपशीलवार वतन-रजिस्टरें पुष्कळ ठिकाणी होणे राहिली आहेत. जागल्याची नेमणूक बहुधा तहायात असते; ती पोलीस सुपरिटेंडेंट करतो, व तिला प्रांत मॅजिस्ट्रेटची मंजुरी लागते. त्यांच्या नेमणुकीचे काम सरकारांत गेल्यामुळे कोणच्या गांवाला किती जागले लागतात, ह्याची वेळोवेळी सरकारी अंमलदार चौकशी करतात, आणि जरूर तितक्याच जागल्यांची नेमणक करतात. ह्यामुळे सरकारने नेमलेल्या जागल्यांची संख्या गांवोगांव नियमित झाली आहे. परंतु गांवकामगार सदर संख्येपेक्षा जास्त जागले गांवकीवर लावून घेतात, किंवा कोठे कोठे ते स्वतःच कामावर उभे राहतात. अशा जागल्यांना सरकारांतून मुशाहिरा मिळत नाही, पण गांवकऱ्यांकडून बलुतें, हक्क वगैरे मिळतात. जागल्यांना कोठे कोठे इनाम जमिनी आहेत. सरकार नेमतें त्या जागल्यांना तें दरसाल पांच ते दहा रुपये रोख मुशाहिरा देते. गांवकामगार दरसाल मामूल वहिवाटीप्रमाणे गांवकीवरील महारांना नेमून घेतात. महारांची काठी कोठे अक्षयतृतीयेला, तर कोठे भावईच्या अमावास्येला बदलते. महारांना रोख मुशाहिरा नाही. बहुतेक गांवीं महारांना इनाम जमिनी आहेत, त्यांना 'हाडकी हाडोळा' म्हणतात. ज्या गांवीं महारांना इनाम नाहीं त्यांतल्या क्वचित् गांवांत त्यांना जागल्याप्रमाणे रोख पांच दहा रुपये सालीना मुशाहिरा सरकार