पान:गांव-गाडा.pdf/111

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०      गांव-गाडा.


देतें. अशा ठिकाणी महारांची संख्या जागल्यांप्रमाणे सरकारने नियमित केली आहे. तरी पण गांवकामगार तिजपेक्षा जास्त महार लावून घेतात. साधारणतः सर्वत्र पाडेवार महारांची संख्या प्राचीनपासून जी चालत आली आहे तितकीच सर्वत्र अद्याप कायम आहे. किंबहुना गांवकामगारांच्या चालढकलीने ती वाढली असे म्हटले तरी चालेल. गांवकीचे कामाबद्दलची जिम्मा नेमलेल्या महारांवरच आहे, असें सरकार, गांव व महार समजत नाहीत; ती समस्त महारांची समजली जाते. म्हणून, ज्या गांवीं गुरांना विषप्रयोग फार होतात, तेथले सबंध महार-वतन सरकार जप्त करते. महार-जागले ह्यांचे पोट सर्वस्वी रयतेकडून मिळणाऱ्या ऐन जिनसी बलुत्यावर चालते. त्यांच्या कामाबद्दल रयतेकडून मिळणाऱ्या बलुत्यांसबंधाने लढा पडला म्हणजे वतन आक्ट कलम १८ प्रमाणे कलेक्टर पंचायत नेमतो. तिचे दोन पंच गांवकरी व दोन पंच वतनदार महार जागले नेमतात, आणि सरपंच कलेक्टर नेमतो. पंचायतीच्या निवाड्याप्रमाणे वतनदार महार जागल्यांनी आपली कामें केली पाहिजेत, आणि रयतेने त्यांना हक्क दिले पाहिजेत. सरपंच नेमल्या तारखेपासून सात दिवसांत पंचायतीने निवाडा न दिला, तर कलेक्टर निकाल देतो, व त्याप्रमाणे अंमलबजावणी होते.

 महार-जागले हे पाटील-कुळकर्ण्याचे हरकामे शिपाई होत. सरकारी कामानिमित्त ज्या इसमाची त्यांना गरज लागते त्याला बोलावणे; गांवांत कोणी परकी मनुष्य आला, जनन, मरण किंवा गुन्हा झाला, काळीपांढरीतली सरकारी मालमत्ता, झाडें, हद्दनिशाण्या यांचा बिघाड झाला किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केलें, तर त्याबद्दलची बातमी पाटील-कुळकर्ण्याना देणे; गांव स्वच्छ ठेवणे; गस्त घालणे; पाटील-कुळकर्ण्याबरोबर काळी-पांढरीत व परगांवाला सरकारी कामानिमित्त जाणे; गांवचा वसूल, कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगांवीं पोचविणे; पलटणचा बंदोबस्त, सरकारी अंमलदारांची सरबराई, गाड्या धरणे वगैरे कामांत पाटील-कुळकर्ण्याना मदत करणे; इत्यादि कामें महार